18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंवर सलग दुसरा गुन्हा दाखल

मनोज जरांगेंवर सलग दुसरा गुन्हा दाखल

बीड : प्रतिनिधी
परभणी येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी न्याय मागण्यासाठी निघालेल्या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी मुंडेंविरोधात परभणीत वादग्रस्त वक्तव्य केले. मनोज जरांगे पाटील हे जातीयवाद करत असून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे काल धनंजय मुंडे समर्थकांनी परळी शहर पोलिस स्टेशनसमोर जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत आंदोलन केले.

मुंडे समर्थक हे रविवारी दुपारी दोन वाजल्यापासून बीडच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून बसले होते. या ठिय्या आंदोलनात त्यांच्याबरोबर महिला देखील सामील झाल्या. अखेर पहाटे ३ वाजता धनंजय मुंडेंविरोधात परभणीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगेंवर बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना शिक्षा व्हावी आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी शनिवारी परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्याचबरोबर जर देशमुख कुटुंबीयांना त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही दिला होता. त्यामुळे जरांगेंवर सलग दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीच्या मोर्चामध्ये बोलताना मनोज जरांगे म्हणाले होते की, देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय.
संतोष भैय्याचे भाऊ जेव्हा पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय, म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR