जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (शनिवार) अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू करताना जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.
आरक्षण न देता मराठा समाजाला, धनगर समाजाला वेड्यात काढायचे आणि नवीन काय तरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ. आता लाडकी मेव्हणी नाहीतर लाडका मेव्हणा आणायचे. निवडणूक होईपर्यंत पैसे वाटायचे, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला लगावला.
गोरगरिबांना लक्षात येत नाही. लाडका बहीण, लाडका भाऊचे पैसे घ्यावे की लेकरांसाठी लढावे. गरिबांना वाटते सरकार पैसे देत आहे. त्यामुळे काय झाले लाडका भाऊ, लाडकी बहीण यांची लाईन तिकडे लागली. आता तिथं लाडकी मेव्हणीपण येणार आहे. तिथे झाली गर्दी त्यामुळे साईट पडल्यात बंद, त्यामुळे मुलांना अॅडमिशन घेता येत नाहीत. सरकार थोडं बधिर झालं आहे का? असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मुलींना शिक्षण मोफत मिळत नाही
मुलींना शिक्षण मोफत केलं आहे. पण, मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही. व्हॅलिडिटीची अट ठेवली आहे. चंद्रकांतदादा म्हणाले, समाजाला आणखी काय द्यावे? महामंडळ आणि सारथी दिल्याचं सांगतात. पण, सारथीमधील विद्यार्थ्यांचे काय हाल आहेत? हे त्यांना एकदा विचारून पाहा. महामंडळातील प्रकरणं कशी करण्यात येतात हे सुद्धा गावखेड्यातील तरुणांना जाऊन विचारा. मोफत शिक्षणात अटी टाकल्यात त्यामुळे कोणत्याच जाती-धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही.
अंतरवालीमध्ये येऊ नका
मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. मात्र, पावसाचे दिवस असल्याने शेतीची कामे उरका, अंतरवालीमध्ये येऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केले आहे.