लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भुमिका घेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात जनजागृती व शांतता रॅली सुरु केली आहे. दि. ९ जुलै रोजी जरांगे लातूर जिल्ह्यात येणार आहेत. तत्पुर्वी या शांतता रॅलीच्या जनजागृती करीता आज दि. ८ जुलै रोजी सकाळी १.३० वाजता लातूर शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मंगळवारी लातूरला येत आहे. त्या अनुषंगाने रविवार दि. ७ जुलै रोजी सकाळी येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात अखंड मराठा समाज जिल्हा लातूरची व्यापक बैठक झाली. या बैठकीत आज रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळी १०.३० वाजत येथील औसा रोडवरील शासकीय विश्रामगृह येथुन मोटार सायकल रॅलीस प्रारंभ होणार आहे. औसा रोडवरुन छत्रपती शिवाजी महाराज चौक, पीव्हीआर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पु. अहिल्यादेवी होळकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, गंज गोलाई, छत्रपती राजर्षी शाहू महराज चौक, स्वामी विवेकानंद चौक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक, जुने गुळ मार्केट चौक, महात्मा बसवेश्वर चौक ते राजीव गांधी चौक असा मोटार सायकल रॅलीचा मार्ग असणार आहे. या मोटार सायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखंड मराठा समाज लातूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.