छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात चांगला धक्का बसला आहे. आता भाजप आणि राजकीय विश्लेषक यावर विचारमंथन करतील. पराभवाची कारणे समोर येतील. परंतु मराठवाड्यातील आठ मतदार संघांत भाजपचा धुव्वा उडाला. मराठवाड्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होण्यामागे महत्त्वाचे कारण मनोज जरांगे फॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून सुरुवात केली. अंतरवाली सराटीत त्यांनी उपोषण केले. त्यांच्या उपोषणस्थळी लाठीमार झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले. परंतु त्यांची सगेसोय-याची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे मराठा समाजातील नाराजीचा फटका महायुतीला बसला.
मराठवाड्यातील सहा ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव झाला. मराठवाड्यात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला चांगलेच यश मिळाले. जालनामध्ये काँग्रेसचे कल्याण काळे, काँग्रेसचे शिवाजीराव काळगे (लातूर), नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, हिंगोलीतून ठाकरे गटाचे नागेश पाटील, धाराशिवमधून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, परभणी ठाकरे गटाचे संजय जाधव निवडून आले आहेत.