22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात पावसाचा जोर

मराठवाड्यात पावसाचा जोर

छ. संभाजीनगर/लातूर : प्रतिनिधी
विदर्भ, कोकणासह मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असला तरी मराठवाड्यातही गेल्या दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळत आहे. त्यात काही भागांत मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांना पूर आला आहे तर काही ठिकाणी दमदार पाऊस पडल्याने पिकांना आधार झाला आहे. दरम्यान, सरसकट पाऊस नसल्याने प्रकल्पांतील पाणी पातळीत म्हणावी तशी वाढ होताना दिसत नाही. दरम्यान, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला. सोमवारी सकाळी ११ पासूनच ब-याच भागात पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.

छ. संभाजीनगरसह सोयगाव तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाला. सोयगावमध्ये नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. तालुक्यातील निंबायती गावाला पुराने वेढा घातला होता. पुरामुळे तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. या पुरात वरखेडी बुद्रुक येथील तुकाराम सरिचंद जाधव यांची बैलजोडी पाण्यात वाहून गेली. परभणी जिल्ह्यातही दोन दिवसांत चांगला पाऊस झाला. सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला. जिंतूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने जिंतूर-औंढा रोडवरील पर्यायी रस्ता वाहून गेला. नांदेड, हिंगोली, जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. हिंगोलीत तर आज पिवळा पाऊस पडल्याची चर्चा रंगली होती. बीड जिल्ह्यातदेखील पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांतून पाणी वाहू लागले आहे. दोन दिवसांत संपूर्ण मराठवाड्यात सर्वदूर पाऊस झाल्याचे चित्र आहे.

धाराशिव जिल्ह्यातही ब-याच भागांत पावसाने हजेरी लावली. सोमवारी दुपारी ३ पर्यंत पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर पावसाने उसंत घेतली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन नाही. या अगोदर रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळाले. त्यामुळे पिकांना चांगलाच आधार झाला आहे. परंतु विविध प्रकल्पांत पाणी वाढण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

लातूरमध्येही दमदार हजेरी
लातूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी दुपारी आणि त्यानंतर रात्री जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. लातूर जिल्ह्यात रोजच पाऊस हजेरी लावत असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. परंतु मोठ्या पावसाची लातूरकरांनाही प्रतीक्षा आहे. लातूरमध्ये बॅरेजेस भरले आहेत. मात्र, धरणांत पाणी वाढले नाही, अशी स्थिती आहे.
हिंगोलीत पिवळा पाऊस
हिंगोलीमध्ये पिवळा पाऊस पडल्याची आश्चर्यकारक घटना घडली. सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावच्या शिवारात पिवळे थेंब कोसळले. ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिली. त्यानंतर याबाबत प्रशासन अभ्यास करीत असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR