मुंबई/लातूर/नांदेड/परभणी/हिंगोली/बीड : प्रतिनिधी
देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान मांडले असून दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत शनिवारी मध्यरात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत असून ऐन बैलपोळ्याची दिवशीही जोरदार पावसामुळे परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. पुराच्या पाण्यात बस वाहत गेल्याची घटना परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वझुर(बु.) या गावी पहाटे चारच्या सुमारास घडली. वझुर गावी पाथरी आगाराची ही बस मुक्कामी होती. चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख हे दोघे बसमध्ये झोपलेले होते. तर लातूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्हावासीयांनी सतर्कता बाळगावी. विशेषत: नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन लातूर जिल्हाधिका-यांनी केले आहे. दरम्यान, विदर्भालाही पावसाचा तडाखा बसला आहे.
मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेल्याने मराठवाड्यातीलअनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेल्याने खरीप हंगामही वाया गेला. शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. नद्या, नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान विरोधी पक्षांच्या वतीने सरकारची कानउघाडणी होत असून सरकारने इव्हेंटबाजी व जाहिरातबाजी बाजूला ठेवून मराठवाड्यातील पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत पोहचवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची सर्व व्यवस्था करावी. सर्व सरकारी यंत्रणा तातडीने कामाला लावून जनतेला आधार देण्यास व सर्व प्रकारची मदत पोहोचेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हिंगोली शहरासह अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने परिस्थीती गंभीर बनली आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीत जास्त मदत पोहचवण्यासाठी सरकारने तातडीने आदेश द्यावेत. अद्यापही पालकमंत्री जिल्ह्यांमध्ये पोहोचले नाहीत. लाडका उद्योगपती व लाडक्या कंत्राटदारासाठी जसे सरकार जलतगतीने काम करते त्यापेक्षा जास्त गतीने पूरग्रस्त व शेतक-यांना मदत द्या असेही नाना पटोले म्हणाले.
परभणीत २५३ जनावरांचा मृत्यू
परभणी जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसाने थैमान घातले असून नदी-नाल्यांना पुर आला असुन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे २५३ जनावरांचा मृत्यू तर १५२ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. तर जिल्ह्यातील २३ गावचा संपर्क तुटला आहे. परभणी जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायमच होता तर सोमवारी सकाळपासूनच पाऊस सरूच होता. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्या २४ तासात १३८.४ मी.मी. पाऊस झाला असुन जिल्ह्यातील ५० मंडळात अतिवृष्टी झाली असुन सर्वाधिक पाऊस पाथरी मंडळत ३१४.५ मि.मी. झाला तर पुर्णा व ंिपगळी मंडळात अतिवृष्टी झाली नाही.
धाराशिव येथे अतिवृष्टी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी, कळंब आणि धाराशिव या तीन तालुक्यांत पावसाची सर्वाधिक नोंद झाली असून १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून कळंब तालुक्यातील इटकूर मंडळात सर्वाधिक १५० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
नांदेडच्या ४५ मंडळात अतिवृष्टी
नांदेड जिल्ह्यात पावसाचा तिसरा दिवस असून सलग दुस-या दिवशी सोमवारी ४५ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये तब्बल २५ महसूल मंडळात एकाच दिवशी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पाण्याचा येवा वाढल्याने विष्णुपुरी धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले. तर शहर परिसरात पावसाची संततधार सुरूच होती. यामुळे शहरातील तीन पुल पाण्याखाली गेले आहेत.
मराठवाड्याला रेड अलर्ट
राज्यातील मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर अधिक असून येथील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट आहे. तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
पूरग्रस्तांना तातडीची मदत द्या : पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला असून हजारो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली, घरांची पडझडही झाली आहे. पुरग्रस्त लोकांना मदतीची नितांत गरज असून राज्य सरकारने याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. पूरग्रस्तांना सरकारी मदत तातडीने पोहचेल याची व्यवस्था करावी. जेथे गरज असेल तेथे एनडीआरएफच्या तुकड्या पाठवा. नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी पटोले यांनी केली.
तात्काळ पंचनामे करा : वडेट्टीवार
मराठवाड्यात जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने आता इव्हेंटबाजी मधून वेळ काढून शेतक-यांना मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतीच्या नुकसानीचे सरकारने तत्काळ पंचनामे करावेत व कापसाला हेक्टरी ५० हजार आणि सोयाबीनला हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
तेलंगणात ९ जणांचा बळी
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला पावसाने झोडपून काढलं आहे. रविवारपर्यंत सलग २४ तास येथे मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे आतापर्यंत ९ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या महापुराने शास्त्रज्ञ असलेले वडील-मुलगी, एक आई-मुलगी आणि पती-पत्नीसह ९ जणांचा बळी घेतला आहे.