17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात भाजपला धक्का

मराठवाड्यात भाजपला धक्का

किन्हाळकर, भालेराव यांची भाजपला सोडचिठ्ठी
नांदेड/लातूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमधील बड्या व ज्येष्ठ नेत्यांची खदखद बाहेर येत आहे. मराठवाड्यातील नेत्या तथा माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील भाजपमधून बाहेर पडल्यानंतर आता मराठवाड्यात भाजपला आणखी दोन धक्के बसले. कारण माजी मंत्री माधवराव किन्हाळकर आणि उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भालेराव लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील भाजपचे मोठे नाव असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते राजू शिंदे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. आता नांदेडमधील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. किन्हाळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला. माधवराव किन्हाळकर यांच्याकडे भोकर मतदारसंघाची जबाबदारी होती.

यासोबतच उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली. भालेराव लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे लातूरमध्येही भाजपला धक्का बसला आहे. भालेराव यांच्या रूपाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला लातूरमध्ये आणखी एक मोठा चेहरा मिळाला आहे. विद्यमान आमदार तथा मंत्री संजय बनसोडे यांनी अजित पवार गटासोबत गेल्याने शरद पवार गटाने येथे मोठी खेळी करीत भालेराव यांना आपल्यासोबत घेण्याचे ठरविले आहे.

लातूरमध्ये दुसरा धक्का
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि उदगीर येथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. परंतु दोन्ही आमदार अजित पवार गटासोबत गेल्याने शरद पवार गटाने त्यांच्या विरोधात ताकद लावण्याची योजना आखली. त्याचाच भाग म्हणून अहमदपूरमधून माजी मंत्री विनायकराव पाटील यांना पक्षात घेऊन विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले. तसेच आता उदगीरमध्येही विद्यमान आमदार तथा विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांना आव्हान देण्यासाठी माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्यासारखा मोहरा गळाला लावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR