21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करणार?

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करणार?

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर?, विशेष अधिवेशनाची तयारी!
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षणाचा मोठा फटका मराठवाड्यात बसला. मराठवाड्यातील ९ पैकी केवळ १ जागा महायुतीला मिळाली. भाजप मराठवाड्यात शून्यावर आला. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. आताही मराठा आरक्षणाची धग कायम असून त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत हा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी महायुती सरकारकडून सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर काम करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यासाठी २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान विधिमंडळाचे एकदिवसीय अधिवेशन घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासासाठी जुलैमध्ये राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ तेलंगणाला गेले होते. हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून आवश्यक कागदपत्रं प्राप्त केली. हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आग्रही भूमिका घेतली आहे. तोच मुद्दा निकालात काढण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे.

सध्या मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा जोर कायम असल्याने विधानसभेलाही जरांगे फॅक्टर महागात पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या ४६ जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने यातील २८ जागा जिंकल्या होत्या. आगामी निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जरांगे पाटील मागणीवर ठाम
१८८१ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत मराठवाड्यातील बहुतांश मराठा समाज कुणबी होता. तशा नोंदी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या जनगणनेत नोंदी बदलण्यात आल्या. १८८१ च्या आधारे मराठवाड्यातील मराठा समाजाला आणि सातारा संस्थांच्या नोंदी तपासून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावेत, अशी जरांगे पाटलांची मागणी आहे.

सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार
सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेण्यासाठी १७ तारखेला पुन्हा एकदा मी शेवटचे उपोषण करत आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात फूट पाडण्याचे काम केले. पैसे देऊन लोक आंदोलनात पाठवली. पण येणा-या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देऊ, पाच हजाराची लीड तोडताना तोंडाला फेस आला पाहिजे, असे आव्हान थेट जरांगेंनी फडणवीसांना विधानसभेसाठी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR