रत्नागिरी : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा वाद अजुनही मिटलेला नाही. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, त्यांचा समावेश ओबीसीमध्ये करावा, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यात आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री नारायण राणे यांनी आरक्षणाच्या मुद्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.
कोकणात कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहेत. अशा वेळी कुणीही मराठा स्वत:ला कुणबी म्हणून घेणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण नको अशी स्पष्ट भूमिका राणे यांनी घेतली आहे. मागास समाज म्हणून घटनेच्या १५ आणि १६ (४) मध्ये जी तरतूद आहे, त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण द्या. सर्व्हे करून मागासलेपणा आढळल्यास राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आरक्षण द्या असं ते म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागे असलेला मोठा गट ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहे. शिवाय कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिली जावीत असं ही त्यांचे म्हणणे आहे. त्यात आता राणे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मनोज जरांगे पाटील हे काय प्रतिक्रीया देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राणे यांच्या या भूमिकेला याआधीही मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केला होता.