26.1 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रमविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

९६,९६,९६... मुख्यमंत्री कुणाचा होणार?

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मात देणा-या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणूक २०२४ साठी फॉर्म्युला ठरला आहे.

समसमान जागा घेण्याबाबत मविआत विचार सुरू असल्याची माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. तसेच अधिक आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, अशी माहिती देखील समोर आली आहे. मविआत प्रत्येक पक्षाला विधानसभेसाठी ९६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीने यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस एकदिलाने लढतील. काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या, आघाडीच्या नेत्यांनी हे फेटाळत एकत्र निवडणुका लढणार असल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील जनतेने भाजपला उत्तर दिले आहे. हा लढा लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी होता. हा विजय आमचा शेवटचा नाही, तर लढाई नुकतीच सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

विधानसभा निवडणूक आम्ही सर्व मिळून लढू. पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काय केले ते सर्वांसमोर आहे. याला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, असे देखील ठाकरे म्हणाले.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसंदर्भात आमची पहिली बैठक झाली. या बैठकीत आम्ही सर्वजण मिळून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीत मतदान केले. लोकशाही वाचवण्यात राज्यातील जनतेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

राज्यातील शेतक-यांनीही सरकारला संदेश दिला आहे. महायुतीचे धार्मिक ध्रुवीकरणही कामी आले नाही. येत्या काही दिवसांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. जनतेने जाणीवपूर्वक मतदान केले. आमच्यात कोणी लहान किंवा मोठा भाऊ नाही. आपण सर्वजण भेटून चर्चा करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR