15.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Home‘मविआ’चा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेला ९० जागा

‘मविआ’चा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेला ९० जागा

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
‘मविआ’ आणि महायुतीमध्ये जागावाटपावरून अजूनही रस्सीखेच सुरुच आहे. जवळपास ९० टक्के जागा वाटप झालेले आहे. ब-याच जागांवर उमेदवारही जाहीर झाले आहेत. आता राहिलेल्या जागांवरून दिल्लीत दोन्ही आघाडी-युतीच्या बैठका सुरु आहेत. ठाकरे गटासोबत काँग्रेसचा जागावाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी गेला आहे. आधी आलेला ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला आता बदलला असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात दिल्लीत आहेत. यावेळी थोरात यांनी पत्रकारांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला. काँग्रेस, ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या जागा वाढून त्या ९०-९०-९० झाल्या आहेत. तर १८ जागा आम्ही मित्रपक्षांना दिल्या असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी कुठेही मैत्रीपूर्ण लढत करणार नाही. आमचे सक्षम असलेले उमेदवार आम्ही देणार आहोत. राज्याची निवडणूक आहे, काही अडचणी आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही थोरात म्हणाले. मित्रपक्षांसाठी १८ जागा बाजुला ठेवलेल्या आहेत. त्यातूनही किती सुटतात ते पाहत आहोत. आमचा ८५-८५-८५ चा फॉर्म्युला वाढून आता ९० वर गेला आहे. काँग्रेस १०० च्या पुढे जाऊ शकते का, याची बेरीज अद्याप केलेली नाही असेही थोरात यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने ४८ जागांची यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. महाविकास आघाडीकडून १५८ जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ६५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील उर्वरित जागांवर उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR