कोल्हापूर : जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक नुकतीच मुंबईत झाली. बैठकीनंतर कोल्हापुरात काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी मविआत जागांची अदलाबदल होणार असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारीबाबत विचारले असता पाटील यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील ज्या पक्षाची ताकद आहे, त्या पक्षाला तो मतदारसंघ सोडण्यात येईल, तर परिस्थितीनुसार ज्या त्या पक्षातील उमेदवार जागा मिळालेल्या पक्षाला देण्यात येतील, असे स्पष्ट अदलाबदलीचे संकेत सतेज पाटील यांनी दिले आहेत.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे दोन दिवस कोल्हापूर दौ-यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणाचे इनकमिंग होणार आहे का या प्रश्नावर बोलताना सतेज पाटील यांनी, राज्यात सर्वत्र इनकमिंग सुरू आहे. मात्र, सध्या काँग्रेस भरगच्च भरली असून काँग्रेस सध्या हाऊसफुल आहे. परंतु कोणी आले तर त्यांचे स्वागतच करणार असल्याचे पाटील म्हणाले आहेत.
कोल्हापूरमध्ये किती जागा हव्या आहेत, हे जाहीरपणे मी बैठकीत बोललेलो आहे. आताच उघडपणे बोलणं संयुक्तिक नाही. त्याला अधिक फाटे फुटत जातात, त्यामुळे ऐनवेळी मी नक्कीच सांगेल, असे आमदार सतेज पाटील म्हणाले.