पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोहोंतील पक्षांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तम यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता महाविकास आघाडीला १८३ जागा मिळतील असं भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. तसंच महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी, पुणे पिंपरी चिंचवड रहिवासी यांच्यातर्फे निगडी प्राधिकरण या ठिकाणी असलेल्या ग.दि. माडगूळकर सभागृहात स्रेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडी १८३ जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.
‘‘लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. ६५ टक्के जागा आम्ही जिंकलो. या गोष्टीचा विचार केला तर आम्ही विधासभा निवडणुकीत १८३ जागा जिंकू शकतो, महायुतीचा विचार केला तर ते तीन अंकी संख्याही गाठतील की नाही अशी स्थिती आहे.’’ असं भाकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवलं.
महाराष्ट्रातील सामाजिक वातावरणचिंताजनक आहे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात बारा बलुतेदार समाज, मराठा समाज, दलित समाज असे सगळे समाज खेळीमेळीने राहात होते. त्यांच्यात कधीही तेढ निर्माण झाली नव्हती. काही राजकीय पक्ष समाजांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलं आहे. दलित समाजात बौद्ध आणि दलित तसंच हिंदू आणि दलित अशी विभागणी करुन तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे असाही आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य
मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. फडणवीस सरकारला ते आरक्षण टिकवता आले नाही. सध्या बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न राज्यात आहे. लोकांच्या हाताला काम नाही अशी स्थिती आहे. तसंच मागच्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योगकिंवा कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आलेली नाही. जे उद्योग येत होते ते गुजरातला पळवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातलं वातावरण उद्योगनस्रेही नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. बेरोजगारीमुळेच आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे असाही आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.