कोल्हापूर : ‘मशाल’ला मत दिले तरी ते ‘धनुष्यबाणा’ला जात असल्याची तक्रार राधानगरी मतदारसंघातील बर्गेवाडी येथील मतदान केंद्रावर घडत असल्याची तक्रार करण्यात येत होती. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार के. पी. पाटील यांनी स्वत: जाऊन पाहणी केली.
मत देताना एकाच वेळी दोन चिन्हांच्या समोरील लाईट लागत असल्याची तक्रार करण्यात येत होती. त्यामुळे आम्ही ‘मशाल’ला मत दिले तरी ते ‘धनुष्यबाणा’ला गेल्याची तक्रार स्थानिक काही मतदारांनी केली. मतदारांच्या तक्रारीनंतर के. पी. पाटील आणि मतदार केंद्रातील अधिकारी यांनी मशिनची पाहणी केली. ही तांत्रिक अडचण मतदान केंद्रावरील अधिका-यांनी दूर केली.
तांत्रिक अडचण दूर केली असली तरी अशा प्रकारे किती मते गेली, याची पाहणी करण्यात यावी अशी मागणी के. पी. पाटील यांनी केली. राधानगरी मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे के. पी. पाटील अशी लढत होत आहे.
२०१९ च्या निवडणुकीत प्रकाश आबिटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कृष्णराव पाटील यांचा पराभव केला होता. यंदा मात्र, या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे.
ईव्हीएममध्ये बिघाड
राधानगरी मतदारसंघात तक्रार करण्यात येत असताना कोल्हापूर मतदारसंघात देखील ईव्हीएम मशिन बंद पडल्याची तक्रार करण्यात आली होती. विक्रम हायस्कूल मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडल्याचे सांगण्यात येत होते.