बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख यांच्या खुनाची चौकशी करण्यासाठी सीआयडी पथक आज मस्साजोगमध्ये दाखल झाले. सीआयडीचे आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज ७ दिवस पूर्ण झाले. विरोधकांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासन हे सतर्क झाले आहे. सीआयडीचे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे.
सीआयडीचे संभाजीनगर विभागाचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. तसेच घटनेबाबत माहिती देखील जाणून घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद आज विधिमंडळातही उमटले. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, सीआयडीने तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली.
दरम्यान, आता संतोष देशमुख यांचे बंधू धनजंय देशमुख यांनी माझ्या भावाची हत्या जातीयवादातून झालेली नाही. राजकारण्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये, असे म्हटले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणात राजकीय किंवा जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या दबावातून चालढकलपणा किंवा काहींना सूट देण्याचा प्रकार घडतोय का, याचीही चर्चा जिल्ह्यात होत आहे.