21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसंपादकीयमहाकुंभात अग्नितांडव!

महाकुंभात अग्नितांडव!

प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेबु्रवारी दरम्यानच्या महाकुंभ मेळ्याला शाही प्रारंभ झाला आहे. या महाकुंभ मेळ्याची तयारी उत्तर प्रदेश प्रशासनाने उत्तम प्रकारे केली आहे. महाकुंभाला येणा-या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जातीने महाकुंभाच्या तयारीचा आढावा घेतला होता. या पवित्र धार्मिक सोहळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या तिजोरीत सुमारे २ लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. या महाकुंभाला ४० ते ४५ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. महाकुंभ ही भारताची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. यामुळे देश-विदेशातील जनतेला आपल्या प्राचीन परंपरा समजण्यास मदत होणार आहे. येणा-या पिढ्यांनाही हा महाकुंभ मार्गदर्शक ठरेल. यंदाचा महाकुंभ भव्यदिव्य आणि डिजिटल असेल.

भाविकांच्या सुविधांसाठी पर्यटन नकाशा, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहायाने सुरक्षा यंत्रणा व स्मार्ट फोनच्या सहायाने प्रसाधनगृहांची स्वच्छता पाहण्याची सोय करण्यात आली आहे. कोट्यवधी भाविक उत्तर प्रदेशात दाखल होत असल्याने प्रवास, निवास व भोजन आदींमुळे स्थानिक व्यवसाय व रोजगार वाढणार आहे. २०२४ मध्ये १६ कोटी भाविकांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले तर अयोध्येत जानेवारी ते सप्टेंबर २०२४ मध्ये १३ कोटी ५५ लाख भाविक आले होते. यंदाच्या महाकुंभात ४ प्रकारच्या तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. डिलक्स, प्रीमियम, डिलक्स ऑन रॉयल बाथ आणि प्रीमियम ऑन वॉयल बाथ अशा चार प्रकारच्या तंबूंची व्यवस्था आहे. डिलक्स रूममध्ये एक दिवसाचे भाडे साडे दहा हजार रुपये आहे. प्रीमियम श्रेणीचे दिवसाचे भाडे १५,५२५ रुपये आहे. शाही स्नानाच्या दिवशी डिलक्स तंबूचे भाडे १६ हजार १०० रुपये तर प्रीमियम श्रेणीतील तंबूचे भाडे दिवसाला २१ हजार ७३५ रुपये ठेवण्यात आले आहे. या महाकुंभात उद्योगपती गौतम अदानी दररोज १ लाख भाविकांना प्रसादाचे वाटप करत आहेत.

महाकुंभामध्ये राहण्याची शाही व्यवस्था करण्यात आली आहे. नदीच्या किनारी ४४ तंबू आहेत. त्यात २ जणांची राहण्याची सोय आहे. या तंबूचे एका दिवसाचे भाडे १ लाख रुपये आहे. या तंबूत बटलरपासून रुम हिटर, बाथरूम, गिझर आदी सुविधा आहेत. १४, २९ जानेवारी व ३ फेब्रुवारीला या तंबूंना मोठी मागणी आहे. कारण या दिवशी शाही स्नान असते पैकी १४ जानेवारीचे शाही स्नान पार पडले आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचा पवित्र संगम आहे. ४५ दिवस चालणा-या या कुंभमेळ्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. १३ जानेवारीला महाकुंभमेळा सुरू झाला. पहिल्याच दिवशी दीड कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. दर तासाला सुमारे २ लाख भाविकांचे स्नान झाले. महाकुंभाच्या मुख्य स्नान आणि मकरसंक्रांतीच्या दिवशी हेलिकॉप्टरमधून संत आणि भक्तांवर २० क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला. दर १२ वर्षांना होणारा कुंभमेळा २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला संपेल. अशा या शाही महाकुंभमेळ्याला रविवारी (१९ जानेवारी) भीषण आग लागल्याने गालबोट लागले. या आगीत १८ तंबू जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कुंभनगरीतील सेक्टर १९ मधील एका तंबूत स्वयंपाक सुरू असताना दुपारी साडेचारच्या सुमारास एका सिलिंडरमध्ये स्फोट झाला. या ठिकाणी गीता प्रेस या प्रकाशन संस्थेचे शिबिर आहे. आगीने आजूबाजूचे तंबू पेटले त्यामुळे तंबूतील सिलिंडरचेही स्फोट झाले. आग लागलेल्या ठिकाणाजवळ रेल्वे पूल आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या कर्मचा-यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. आगीत गीता प्रेसचे लाखो रुपयांचे साहित्य जळाले. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे. रविवारपर्यंत सुमारे ८ कोटींहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केले, असो. एवढ्या मोठ्या सोहळ्याचे आयोजन करताना काही अप्रिय घटना होतातच. पर्यावरणाच्या असमतोलातून नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे हे प्रगतीचा टेंभा मिरवणा-या मानवाला शक्य होत नाही, हे आजवर अनेक वेळा सिद्ध झाले आहे.

गत आठवड्यापासून लॉस एंजेलिसमध्ये भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असताना दक्षिण कॅलिफोर्नियात नवी आग लागली. महाशक्तीशाली अमेरिकासुद्धा या आगीसमोर हतबल झाली. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या निसर्गातील मुलभूत घटक असलेल्या पंचमहाभूतांचे निसर्गाप्रमाणेच मानवी जीवनातही मोठे महत्त्व आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्यास ही पंचतत्त्वे बेकाबू होतात. म्हणूनच निसर्गाच्या विरोधात जाणे मानवाला अतिशय महागात पडते. निसर्गाचे रौद्र स्वरूप निसर्गाची हानी करून उतलेल्या-मातलेल्या मानवाला त्याची मर्यादा दाखवण्याचे काम करते. यामुळे मानवाने त्यातून धडा घेत निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवाने तेच दाखवून दिले आहे. लॉस एंजेलिस येथील जंगलाला लागलेली आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली.

३ दिवसांत सुमारे ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्राला या आगीची झळ बसली त्यात १९०० इमारती खाक झाल्या. २८ हजार घरांचे नुकसान झाले आणि ५ जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दशकामध्ये जलवायू प्रदूषण, वाढते शहरीकरण आणि मानवी हस्तक्षेप वाढल्याने अशा घटना वाढल्या आहेत. दुस-या एका वृत्तानुसार प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात आग लागल्याने सुमारे २०० तंबू जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते. इतक्या प्रचंड प्रमाणात आयोजित धार्मिक मेळ्यात काही अपघात घडणार हे अपेक्षित असले तरी शक्य तेवढी खबरदारी ही घ्यायलाच हवी. या पुढे अप्रिय घटना न घडता १४४ वर्षानंतर आलेला पावन महाकुंभ मेळा पार पडावा, हीच सदिच्छा!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR