21.4 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeअंतरराष्ट्रीयमहादेव बेटिंग अ‍ॅपचा मुख्य सुत्रधार अखेर दुबईत जेरबंद

महादेव बेटिंग अ‍ॅपचा मुख्य सुत्रधार अखेर दुबईत जेरबंद

दुबई : वृत्तसंस्था
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी मुख्य आरोपी आणि मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला दुबईत अटक करण्यात आली. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

ईडीच्या कारवाईवरून २०२३ मध्ये सौरभ चंद्राकरला पोलिसांनी दुबईतून ताब्यात घेतले होते. तेव्हापासून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले. आता जवळपास सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून येत्या १० दिवसांत त्याला भारतात आणले जाईल, असे ईडीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. महादेव अ‍ॅप प्रकरणात काही बड्या राजकीय नेत्यांची नावेही समोर आली आहेत.

चंद्राकरला गेल्या वर्षी डिसेंबरपासून दुबईत नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ईडीने रायपूर येथील विशेष मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक आरोपपत्रात चंद्राकर, उप्पल आणि इतर अनेकांची नावे होती.

ईडीने आरोप केला आहे की, सौरभचे लग्न रास अल खैमाह, यूएई येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये झाले होते आणि यासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यामध्ये खाजगी जेट भाड्याने घेणे आणि सेलिब्रेटींना भारतातून आणि त्यांच्या नातेवाईकांना विमान प्रवासासाठी पैसे देणे समाविष्ट होते.

या प्रकरणात सुमारे ६,००० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ईडीचा अंदाज आहे. अधिका-यांनी सांगितले की, ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, महादेव ऑनलाइन बुक अ‍ॅप यूएईमधून ऑपरेट केले जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR