छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात मोठ्या बहुमताने महायुतीचे सरकार आले असून अद्याप शेतक-यांना दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत. आमचे सरकार आल्यावर शेतकरी कर्जमाफी करू असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. सरकार सत्तेवर येऊन जवळपास दोन महिने होत आहेत.
मात्र शेतकरी कर्जमाफीवर सरकारने चकार शब्द देखील काढलेला नाही, यावरून विरोधकांनी सरकारला आता घेरण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी कर्जमाफीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट महायुती सरकारवर टीका केली आहे.
महायुतीतील भाजपमधील अनेक नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांचे कर्ज माफ केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा विषय ऐकला का? ….अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात, असे म्हणत हात वर केले आहेत. यावरून आता कर्जमाफीच्या
घोषणेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
याच मुद्यावरून आता विरोधकांनीही रान उठवायला सुरुवात केली आहे. तर शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उठवला जाईल असे म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी देखील महायुतीला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे. आता ती आश्वासने पूर्ण करतील का? अशी शंकाच असल्याचे म्हटले आहे.
तसेच शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील १ कोटी २१ लाख शेतक-यांना मदत मिळत होती. आता ती संख्या ८१ लाखांवर आणली गेली आहे. जवळपास ४० लाख शेतक-यांना सरकारने कात्री लावली आहे. तर येणा-या काळात देखील लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतही हेच होणार आहे, असाही दावा दानवे यांनी केला आहे.
तर शेतक-यांना विविध आश्वासने देणारे महायुतीवाले आता सरकार झाले आहेत. पण ते शेतक-यांच्या तोंडाला पानंच पुसतील अशी परिस्थिती आहे. पण विरोधक म्हणून शेतक-यांची कर्जमाफी झालीच पाहिजे याबाबत आम्ही आवाज उठवणार असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे.