मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आगामी विधानसभेच्या अनुषंगाने राज्यात मोठी तयारी झाली आहे, अशातच आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देखील मोठी रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नेत्यांमध्ये खडाजंगी उडत आहे.अशातच ‘बॅनर वॉर’मधून देखील आपलाच मुख्यमंत्री राहणार आशा आशयाचे बॅनर लागत आहेत.
अशातच आता कार्यकर्त्यांकडून आपापल्या नेत्यांच्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. नांदेडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. नांदेड शहरातील अनेक मुख्य चौकात हे बॅनर लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. महायुतीत जागा वाटपावरून आणि मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू असून हा वाद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे.
अजित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. बारामती शहरातील अखिल भारतीय तांदुळवाडी वेस या गणपती मंडळाने अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत.. या आधी देखील अनेक वेळा अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री आशा आशयाचे फ्लेक्स लागले होते.
एकनाथ शिंदेंसाठी गणरायाला साकडे
शंभुराज देसाई यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दगडूशेठ गणपतीला साकडं घातलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, दगडूशेठ मंदिरासमोर सांगतो, महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळणार आणि पुन्हा महायुती सत्तेत येणार आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे मला वाटते. मात्र मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महायुतीतले तिन्ही नेते घेतील, असे शंभुराज देसाई म्हणाले आहेत.