कल्याण : प्रतिनिधी
कल्याणमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपमधील वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याणमध्ये शिंदे गटाच्या पदाधिका-यांकडून भाजपला डिवचणारे बॅनर लावले आहेत. मागील महिन्याभरापासून शिंदे गटाचे पदाधिकारी बॅनरच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या भाजप आणि आमदार गणपत गायकवाड यांना लक्ष्य करत आहेत.
कल्याण पूर्व मतदारसंघावर भाजपसह शिंदे गटाने देखील दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येईल, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने देखील या मतदारसंघावर दावा करत ही जागा आमच्या वाट्याला यावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केल्याची माहिती आहे.
शिंदे गटाचे पदाधिकारी विशाल पावशे यांनी कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात पुन्हा भाजप आमदार गणपत गायकवाड यांना डिवचणारे बॅनर लावले आहेत. काय हवे? घाला गुन्हेगारीला आळा, लावा फ्री केबलला टाळा, अशा आशयाचे बॅनर लावत पावशे यांनी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल व्यवसायावर थेट हल्ला केला आहे. त्यामुळे या घटनेने दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.