मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सुरू असलेला जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नाही. आता दुस-या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अजूनही जागावाटपाचा अंतिम निर्णय होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महायुतीत ४ जागांवरून तिन्ही पक्षात संघर्ष पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर आणि अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठकांवर बैठका सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जागावाटपाचा तिढा पाहायला मिळत आहे. भाजपकडून या जागेवर दावा केला जात आहे तर दुसरीकडे शिंदेसेनादेखील हा मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नसल्याचे चित्र आहे. शिंदे गटाकडून संदीपान भुमरे आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे तर भाजपकडून भागवत कराड इच्छुक आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकाचवेळी दावा केला आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघासाठी अधिक रस्सीखेच पाहायला मिळत आहे तर भाजपनेदेखील दावा केला आहे.
भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा आहे तर राष्ट्रवादीने आमदार विक्रम काळे किंवा माजी जि. प. अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
महायुतीच्या जागावाटपात सर्वाधिक अडचणीचा ठरणारा मतदारसंघ म्हणून नाशिककडे पाहिले जात आहे. शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत या मतदारसंघावर संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना कामाला लागा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या तर आपल्या नावाची चर्चा थेट दिल्लीत झाल्याचा दावा राष्ट्रवादीचे छगन भुजबळ करत आहेत. अशात भाजपकडून देखील उमेदवाराची चाचपणी सुरूच आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी मंत्री उदय सामंत आग्रही
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिंदेसेना आणि भाजपात एकमत होत नसल्याचे चित्र आहे. ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी उदय सामंत आग्रही आहेत. कारण उदय सामंत यांचा भाऊ किरण सामंत या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत.
जागावाटप निश्चित?
सूत्रांच्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळाले असून, तेथे विनोद पाटील किंवा संदीपान भुमरे उमेदवार असू शकतात. धाराशिवची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असून, तेथे आमदार विक्रम काळे किंवा अर्चनाताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. नाशिकची जागाही राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असून, तेथे छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळू शकते तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिंदे गटाला मिळतो की, भाजपला हे पाहावे लागेल.