19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुती एकत्र निवडणुका लढविणार; बैठकीत शिक्कामोर्तब

महायुती एकत्र निवडणुका लढविणार; बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभेच्या निकालानंतर विविध स्तरांतून महायुतीत अजित पवार नको असा सूर तयार झालेला आहे. त्याबाबत आता जाहीरपणे वक्तव्येही केली जात आहेत. मात्र भाजपच्या नव्या प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारीच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच कोअर कमिटीच्या बैठकीत महायुती म्हणून निवडणुकांना सामोरे जाण्याचा विचार मांडण्यात आला. जवळपास चार तास चाललेल्या या बैठकीत ‘एकला चलो रे’ ची भाषा नको, जिल्हास्तरावरही महायुती म्हणून समन्वय राखत काम करण्याच्या सूचना दिल्या. आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचा रोडमॅपही शनिवारच्या बैठकीत ठरविण्यात आला. त्यासाठी कमिटीचे सदस्य विभागनिहाय दौरे करणार आहेत.

भाजपाचे नवनियुक्त प्रदेश प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी असलेले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रभारी सहप्रभारींसह राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह राज्यभरातील महत्त्वाचे ४० नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला असून विधाननिहाय सुक्ष्म नियोजनही केले जाणार आहे. या रोडमॅपच्या अंमलबजावणीसाठी लवकरच दुसरी बैठक घेतली जाणार असल्याचे समजते. आगामी निवडणुका भाजप मित्रपक्षांच्या साथीनेच लढविणार असून महायुतीच्या विजयाचा रोडमॅप तयार झाला आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व घटकांचे हित साधणारा आहे.

सर्वसमावेशक विकासासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत झाल्याचे आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. १० जुलैपर्यंत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतील ७०० हून अधिक मंडलांमध्ये सहकारी पक्षांसोबत प्रत्यक्ष जाऊन अर्थसंकल्पाच्या तरतुदींची विस्तृत माहिती जनतेला देण्यासाठी अभियान राबविले जाणार आहे.
लोकसभेनंतर भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटात निर्माण झालेले तणाव दूर करण्यासाठी आता भाजपकडूनच पुढाकार घेतला जाण्याची चिन्हे आहेत. विधानसभेच्या उमेदवारांची निवड करताना सामाजिक, राजकीय आणि जातीगत समीकरणांचा काटेकोरपणे अभ्यास केला जाणार आहे. लोकसभेतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी काही नेत्यांची निवड केली जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR