बारामती : येथे विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेत नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, नीलम गो-हे इत्यादी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज्यातील अनेकांना रोजगार मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.
त्याचबरोबर महिलांनाही संधी देण्याचे काम महायुती सरकार करत आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांनी यावेळी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उशीर होणार होता. पोलिसांच्या ताफ्यात नवीन ३९ गाड्या दाखल झाल्या आहेत. याचा शुभारंभ गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून मी केला. तिथे ३९ वाहनांमध्ये जे ड्रायव्हर होते, त्याच्यात १४ महिला होत्या. सर्वांत चांगले काम त्यांचे सुरू होते. महिलांना संधी देण्याचे काम महायुती सरकार करत आहे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
आज करोडो कामे बारामतीकरांसाठी करण्यात येत आहेत. अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने पुढे जात राहू. एक दिवस विकासाच्या बाबतीत राज्यात बारामती तालुका एक नंबर असेल असा विश्वास यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहेत. त्या संधीचे सोने करायचे आहे. आधीच्या बारामतीत आणि आताच्या बारामतीत मोठा फरक झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना अजित पवारांनी बारामतीत झालेल्या बदलांची यादी वाचून दाखवली. आता राज्यातील सर्वांत मोठं बस स्थानक बारामतीत उभारलं आहे. आज करोडो रुपयांची कामे पूर्णत्वाला जात आहेत. बारामतीचा कायापालट झाला आहे, असेही ते म्हणाले.