पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहेत, पण सध्याच्या राज्यकर्त्यांना महिलांवरील अत्याचार रोखता आले नाहीत.
देशात सर्वांत जास्त शेतक-यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महिलांचा सन्मान आणि शेतक-यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे पण आजचे राज्यकर्ते त्याबाबत काहीच करत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला ४०० खासदार निवडून द्या असे सांगत होते. कारण त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना बदलायची होती. देशातील आमच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रित लोकसभा निवडणूक लढविली. महाराष्ट्रात ४८ खासदारांपैकी ३ङ्म खासदार महाविकास आघाडीचे आले. त्यामुळे भाजप घटक पक्ष ४००चा आकडा गाठू शकले नाहीत. त्यासाठी राज्यातील जनतेला धन्यवाद दिले पाहिजेत.
दोन वर्षांत ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार
राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. त्याला हरकत नाही . महिलांच्या सन्मानाचा आनंदच आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. पण राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दोन वर्षांत ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले आहेत. याचाच अर्थ दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नागपूरमध्ये १३ हजार महिला गायब आहेत, असेही शरद पवार यांनी सांगितले
राज्यात २० हजारपेक्षा जास्त शेतक-यांच्या आत्महत्या
महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आत्महत्याही वाढल्या आहेत. शेतीमालाला किंमत मिळत नाही, बीबियाणे, खते यांच्या किमती वाढल्या आहेत . त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बँकेवाले जप्ती करतात त्यामुळे बेइज्जती होते. त्याचा परिणाम आत्महत्यांमध्ये होत आहे. राज्यात २० हजारपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत १,२६७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मे महिन्यात २०६ तर जून महिन्यात १९३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशात सर्वांत जास्त शेतक-यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत असे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याला पुन्हा एक क्रमांकाचे राज्य बनवायचे असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.