लातूर : प्रतिनिधिी
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्रात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी २०२४ ते मे २०२४ कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरे होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दि. १५ जानेवारी पासून सुरु होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी केले आहे.
नाट्यकलेचा जागर हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नासिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर,छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशीम, ठाणे, नवी मुंबई, मुंबई येथे होणार आहे. यात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्य अभिवाचन, नाट्यछटा, नाट्य संगीत, पद गायन आदी विविध स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा प्राथमिक, उपांत्य आणि अंतिम अशा तीन फे-यांमध्ये होणार आहेत. १५ जानेवारी पासून प्राथमिक फेरी सुरु होऊन यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे. यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे.
अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी चार दिवसीय नाट्य कार्यशाळाही घेण्यात येणार आहे. ही कार्यशाळा नाट्य क्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार आहेत. व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच राज्यातील सर्व गुणवंत कलाकारांना १०० व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिकेही दिली जाणार आहेत. नाट्यकलेचा जागरसाठी लातूर व धाराशिव विभागाचे केंद्र प्रमुख म्हणून प्रदीप पाटील खंडापूरकर, विशाल शिंगाडे यांची तर सहयोगी प्रमुख म्हणून निलेश सराफ, संजय अयाचित यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील जास्तीत कलावंतानी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रदीप पाटील खंडापूरकर, महानगर शाखाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, धनंजय बेंबडे, उमाकांत हुरदुडे, अजय गोजमगुंडे, अमोल नानजकर, कल्याण वाघमारे, सुधन्वा पत्की, अनिल कांबळे, सौ. सुनीता कुलकर्णी, सुनीता नरहरे, प्रा. शशी देशमुख आदी मान्यवरांनी केले आहे.