लातूर : प्रतिनिधी
इतिहासकार, विचारवंत, साहित्यीक आणि कलावंत समाजाचे प्रेरणास्त्रोत असतात. अशी प्रेरणा देणारे विचार मा.म. देशमुख यांच्या लेखनात आहेत. त्यांच्या लेखनातील तटस्थता आणि वस्तुनिष्ठता समाजाला प्रबोधित करते. आजच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या जडण – घडणीत इतिहासकार आणि विचारवंत मा.म.देशमुख यांचे खूप मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी केले आहे.
थोर इतिहासकार आणि संशोधक प्रा.मा.म. देशमुख यांचे नुकतेच नागपूर येथे निधन झाले. त्यानिमीत्ताने ‘ जी-2४ ‘ च्या वतीने लातूर येथील सरस्वती विद्यालयात श्रध्दांजलीचा कार्यक्रम तथा शोकसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मा.म. देशमुख यांच्या सत्य आणि परखड विचार मांडणीमुळे प्रतिगाम्यांनी त्यांना त्रास दिला पण त्यांनी निर्र्भीडपणे त्याला तोंड दिले. त्यांच्यावर झालेल्या आरोपाचे त्यांनी आपल्या वाणी आणि लेखणीतून चोख उत्तर दिले. कायद्यानेही त्यांनी ती लढाई जिंकली. त्यांचे विचार घेऊन वाटचाल करणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल असेही ते म्हणाले. समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शोकसभेत सर्वश्री प्राचार्य आर.डी. निटूरकर, प्रा.डॉ.अशोक नारनवरे, प्रा.अर्जुन जाधव, शिरीष दिवेकर, इंजि.श्रीधर शेवाळे यांनी मा.म.देशमुख यांचे विचार आणि आठवणी सांगीतल्या.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस दिवंगत मा.म.देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रा.डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन यु.डी.गायकवाड यांनी केले तर नरसिंगराव घोडके यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सर्वश्री प्रा.डॉ. निशीकांत वारभूवन,अॅड. किरण कांबळे, अॅड. सोमेश्वर वाघमारे, पत्रकार लक्ष्मण दावणकर, प्रा. हलगरकर, प्रा.डॉ. मारोती गायकवाड, ‘ लसाकम ‘ चे जिल्हाध्यक्ष एकनाथ पलमटे, राजेंद्र हजारे, श्यामसुंदर चव्हाण, पी.के.सावंत, अंगद नेटके, बाबुराव भाले, डी.उमाकांत, श्रीकांत मुद्दे आदी मान्यवरांसह ‘ जी -२४ ‘ चे सदस्य आणि शहरातील बुद्धीजीवी वर्ग उपस्थित होता.