29.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते!

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते!

 पृथ्वीराज चव्हाणांचे खळबळजनक विधान

सातारा : प्रतिनिधी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना महायुती सरकारवर चांगलाच हल्ला चढवला आहे. तसेच यावेळी त्यांनी राजकीय अनुभव आणि मिळालेल्या माहितीनुसार, इथल्या सरकारबाबत गेल्या १० वर्षांची जी अँटी इन्कबन्सी आहे, ती कमी करण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शक्यता आहे, असा दावा चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपलाही धडा शिकवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच काँग्रेसही कामाला लागली आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक सर्व्हे समोर येत आहेत. कधी महाविकास आघाडी तर कधी महायुतीच्या पारड्यात सत्तेचा कौल दिला जात आहे.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, पण एक गोष्ट खरी आहे की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अनपेक्षित पण दमदार कामगिरी केल्यामुळे मराठा आरक्षण, भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटातील वाद यामुळे महायुतीने काही प्रमाणात विधानसभा निवडणुकीचा चांगलाच धसका घेतला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमचं आकलन असं आहे की, कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष निवडणूक वाचवू शकत नाहीत. तर एक मार्ग आहे की, राष्ट्रपती राजवट राबवायची.
आता निवडणूक घेतली तर आपला पराभव निश्चित आहे, असं जर या सत्तेतील पक्षांना वाटत असेल आणि राज्यातल्या सरकारबाबत जी १० वर्षांची अँटी इन्कबन्सी आहे, ती कमी करण्यासाठी येथे राष्ट्रपती राजवट लावून काहीतरी करून काहीतरी चांगलं होईल याविषयी आशावादी राहायचं, असा विचार सत्ताधारी पक्ष करू शकतात असे वक्तव्य काँग्रेस नेते चव्हाण यांनी केले आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर आपल्याला सरकार टिकवता येईल. फक्त राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पॉलिटिकल असणार आहे. सध्याच्या महायुती सरकारची तयारी नसेल तर ते निवडणूक लांबवू शकतात, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
आत्तापर्यंत २००९ पासून तीन निवडणुका झाल्या आहेत. त्यात हरियाणा आणि महाराष्ट्र अशा सोबतच घेण्यात आल्या आहेत. पण यावेळी विशेष परिस्थिती किंवा थातूरमातूर कारण सांगत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज आपण पाहतोय, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्षं झालं निवडणुका झालेल्या नाहीत. इथले राज्यपाल रिपोर्ट देतील, इथली परिस्थिती योग्य नाही किंवा सुप्रीम कोर्टाकडून विरोधात निकाल आला, तर आमदार निलंबित होतील, यांसारखी अनेक कारणं सांगून केंद्रातील भाजप नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हालचाली करू शकतात. गृहमंत्र्याला थातूरमातूर कारण सांगून राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते, असे वक्तव्य चव्हाण यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR