21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार

महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातही हरियाणाची पुनरावृत्ती होईल, आतापेक्षा अधिक मोठे यश मिळवून महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करताना मुख्यमंत्री म्हणून जो चेहरा त्यांच्या मित्रपक्षांना चालत नाही, तो महाराष्ट्राला कसा चालेल, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

दस-याच्या निमित्ताने आज शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी व विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात ह्लजमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो व मातांनो…..अशी करायचे तेव्हा अंगावर रोमांच उभे राहत. पण आज त्यांच्याच वारसांना, हि-यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना हिंदू शब्द उच्चारण्याची लाज वाटत असल्याची टीका शिंदे यांनी केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची जंत्री सांगताना आधीचे निष्क्रिय सरकार घालवले नसते तर यातील कोणताही निर्णय होऊ शकला नसता असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा भगवा बदलण्याचा प्रयत्न केला. काश्मीरचे कलम ३७० रद्द करावे, आयोद्धेत राम मंदिर उभे राहावे हे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न होते. प्रधानमंत्री मोदी यांनी बाळासाहेबांचे स्वप्नं पूर्ण केले. ते तुमचे शत्रू आणि आणि ज्यांना बाळासाहेबांनी कायम विरोध केला ते तुमचे मित्र झाले आहेत. बॉम्बस्फोटातील आरोपी तुमच्या प्रचारात फिरत असल्याचे बघून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील, अशी टीका शिंदे यांनी केली. लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली योजना कोणत्याही परिस्थितीत बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR