नागपूर : प्रतिनिधी
नागरिकांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आणि लढाई केली तर, दिल्ली सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार त्यांना मारेल, असा संदेश या सरकारने दिला आहे. पण काँग्रेस कदापी या सरकारची ही हिटलरशाही महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी महायुती सरकारला दिला आहे. नाना पटोले यांनी नागपुरात आज माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाशवी बहुमत मिळालं. त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे काम सुरू झाले. त्यादरम्यान, परभणीत दलितांवर जानवरांपेक्षा जास्त लाठीचार्ज केला. लोखंडी सळ्यांनी लोकांना मारले, तर हा पाशवी बहुमताचा असर आहे का, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी महायुतीवर निशाणा साधला.
महायुतीला लोकांची गरज नाही. आम्ही मशीनद्वारे जिंकू शकतो. लोकांना बेदम मारहाण करायची. कुठलीही काळजी करायची नाही. मनुष्य जानवरासारखा आहे, या परभणीत घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची आणि त्यांच्या हातात असलेल्या संविधानाची ज्याप्रकारे विटंबना झाली, त्याचा आम्ही निषेध केला. तसेच, या घटनेची शासनाने दखल घ्यावी असे आम्ही शासनाला सांगूनही हे शासन फक्त मलाई खाण्यात व्यस्त आहे , असे काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी म्हटले.
‘कुणाला सर्वाधिक खातं मिळतील, यावर हे तीन मंत्री काम करत आहेत. मात्र प्रशासनाला त्यांनी जे आदेश दिले, त्या आदेशाच्या आधारावर लाठीमार केला. त्यापार्श्वभूमीवर परभणीच्या एसपीवर कारवाई केली पाहिजे, जिल्हाधिकारी यांच्या कारवाई करावी आणि त्यांचं निलंबन करावी ही आमची मागणी आहे’’, असेही पटोले यांनी म्हटले.
परभणी प्रकरण पाहिलं तर, या सरकारची मानसिकता पाहायला मिळते. त्यानुसार दिल्लीत नागरिकांनी त्यांच्या हक्काची लढाई केली तर दिल्ली सरकार त्यांना मारते. तसेच, महाराष्ट्रात लोकांनी त्यांचा हक्कासाठी आवाज उठवला तर त्यांना आम्ही मारणार, असा संदेश या सरकारने दिला आहे. पण काँग्रेस महाराष्ट्रात हे कदापी चालू देणार नाही. महाराष्ट्रा हा शाहू, फुले आणि आंबेडकर यांचा आहे. त्यामुळे या महाराष्ट्रात या सरकारची ही बेबनशाही आणि हिटलरशाही काँग्रेस चालू देणार नाही’’, असा इशारा नाना पटोले यांनी सरकारला दिला आहे.