मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केला त्यात दारु बनवणा-या ‘हेनिकेन’चा समावेश असून, ७५० कोटी रुपयांचा करार केला आहे. तर अइ ्रल्ल इी५ या दुस-या बियर उत्पादक कंपनीसोबत १५०० कोटी रुपयांचा करार केला आहे. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणात्मक तत्त्वांच्या अंतर्गत राज्याने आरोग्यास हानीकारक असलेल्या मादक पेये व औषधांचे वैद्यकीय कारणांशिवाय सेवन प्रतिबंधित करण्यासाठी प्रयत्न करावेत असं अनुच्छेद ४७ मध्ये म्हटलं आहे. पण भाजप सरकार दारुच्या कंपन्यांशी करार करून महाराष्ट्राला आता दारुराष्ट्र बनवायला निघाले आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला.
टिळक भवनातील पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, सिडको आणि बुक माय शो यांच्या मध्ये दावोस येथे १५०० कोटी रूपयांचा करार करण्यात आला. ‘कोल्ड प्ले’च्या तिकीट विक्रीचा काळाबाजार केल्याप्रकरणी ‘बुक माय शो’ची मुंबई पोलीस चौकशी करत आहे. हिरानंदानी कंपनीसोबतही सरकारने करार केला असून या कंपनीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरु आहे. गुन्हेगार कंपन्यांसोबत करार करून सरकार त्यांना काळाबाजार करण्याची सूट देत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, जालन्याच्या धनश्री मंधानी यांच्या प्रायम कंपनीसोबत ड्रोन तयार करण्यासाठी करार केला आहे. ही कंपनी ६००० ड्रोनचे उत्पादन करणार आहे असे सांगितले जात आहे. या कंपनीकडे १० हजार स्क्वेयर फुट जागेवर ड्रोन उत्पादन फॅक्टरी असल्याचा दावा केला जात आहे पण प्रत्यक्षात तिथे कोणतीही फॅक्टरी नसून तेथे स्टीलचे उत्पादन केले जाते. ही कंपनी ड्रोनचे उत्पादन करत नाही तर परदेशातून पाडलेल्या ड्रोनचे पार्ट आणून ते फक्त असेंबल करते असा आरोप नाना पटोलेंनी केला.