22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य

महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या टीकेवर अजित पवारांचे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत समाजातील सर्व घटकांतील पात्र महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. शासनाकडून विविध योजनांच्या घोषणांनंतर विरोधकांकडून पुन्हा सरकारवर टीका होऊ लागली आहे. राज्यावर कर्जाचे ओझे असताना सरकारने केवळ आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून ही घोषणा केल्याची टीका आता विरोधकांकडून होताना दिसत आहे. विरोधकांच्या टीकांवर बोलताना ‘ महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे’ असे प्रत्युत्तर अजित पवारांनी दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सरकारच्या लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांसाठी काय देणार? असा प्रश्न विरोधक सरकारला विचारू लागले. पुढे जाऊन राज्य सरकारने लाडका भाऊ योजना सुरू केली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निधी दिला जाणार आहे. अशा विविध योजनांची घोषणा केल्यानंतर विरोधकांकडून या योजना चालविण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर काय परिणाम होईल यावर टीका व प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, आता विरोधकांच्या या प्रश्नांना स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर उत्तर दिले आहे. सध्या अजित पवार यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे.

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वत:च ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्याच्या वर्ष २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.

राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही. काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे.

राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वितेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, या आशयाचे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR