पुणे : प्रतिनिधी
राज्यात थंडीची लाट पसरली आहे. काही भागात तापमान एका आकड्यावरती आले आहे. तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठत आहेत. उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र पसरली आहे. त्यामुळे तिकडून शीत लहरी वेगाने येत आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे थंडीत किंचित घट होण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, मंगळवारी अहिल्यानगरचा ५.६, तर पुणे शहरातील एनडीए भागाचा पारा ६.५ अंशांपर्यंत खाली आला होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्या भागातून राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहे. या दोन्ही वा-यांची टक्कर महाराष्ट्रात होण्यास सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरपासून मध्य प्रदेशपर्यंत थंडीची तीव्र लाट पसरली आहे. या सर्व भागांत कडाक्याच्या थंडीचा ‘यलो अलट’ देण्यात आला आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदिगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडीचा पारा ० ते ६ अंशांवरती गेला आहे. तर, काश्मीरमध्ये तापमान खाली गेले आहे. राज्यात १८ ते २१ डिसेंबरदरम्यान थंडीत किंचित घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहराचा पारा ६.५ अंशांवर
पुणे शहरासह जिल्ह्यात सोमवार पाठोपाठ मंगळवारी देखील थंडीचा कडाका जाणवला. एनडीए भागाचे तापमान मंगळवारी ६.५ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. शहराच्या किमान तापमानात काही भागात मंगळवारी देखील घट दिसून आली. एनडीए येथे सोमवारी ६.१ तर मंगळवारी ६.५ अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. शिवाजीनगरचे तापमान सोमवारी ७.८ अंश सेल्सिअस होते ते मंगळवारी ८ अंशांवर गेले. तर उर्वरित भागाचे तापमान किंचित वाढले होते.
महाबळेश्वरमध्ये वेण्णालेकवर दवबिंदू गोठले
महाबळेश्वर शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. सोमवारी रात्री थंडीत वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा ४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे वेगवेगळे क्षण अनुभवता येत आहेत. वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. या परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोट्या पोटवल्याचं दिसून आलं.
तोरणमाळ गारठलं
काश्मीर सारखी सातपुड्यात थंडी तोरणमाळ येथील नागरिकांना अनुभवायला मिळते आहे. तोरणमाळ मध्ये तापमानाचा पारा ६ अंशांचा पेक्षा खाली गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. राज्यातील दुस-या क्रमांकाचा थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये काश्मीर सारखी थंडी जावणू लागली आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या तोरणमाळचा घाटात धूक्याची दाट चादर पसरली आहे. प्रसिद्ध यशवंत तलाव दाट धुक्यात हरवला आहे.
थंडीचा केळी भागांना मोठा फटका
कडाक्याच्या थंडीचा केळी भागांना मोठा फटका बसत आहे. लाखो रुपयाचे नुकसान शेतक-यांना सोसावे लागणार आहे. दर , सध्या कडाक्याच्या थंडीमुळे केळी भागांवर मोठ्या प्रमाणात चीलिंगचा प्रश्न गंभीरपणे समोर येऊ लागला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात १० अंशांचा पेक्षा पारा खाली गेल्याने जिल्ह्यातील सर्वच केळी बागायदारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चिलींगमुळे केळीच्या साली वर परिणाम होत असून त्यामुळे केळीच्या आतील गाभा प्रक्रिया करताना खराब होत आहे.