मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनमध्ये आज भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील तसेच नाशिक, भिवंडी व कल्याण, डोबिंवलीमधील भाजप, शिंदे सेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
नाशिकमधील भाजपा पदाधिकारी व माजी सभापती खलील मिर्झा, उषाताई वेंडकुळे, तन्वीर तांबोळी खान, मुस्ताक कुरेशी, छात्रभारतीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पवार, समाधान बागुल, विशाल रनमाळे यांच्यासह मुस्लिम ओबीसी संघटनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कल्याण डोंबिवलीमधील राकेश मुथा यांच्यासह पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
मागील १० वर्षात महाराष्ट्राला व केंद्राला भारतीय जनता पक्ष नावाची कीड लागली आहे. लोकशाही व संविधानाला न जुमानता ते काम करीत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे, शेतक-याला उद्ध्वस्त केले आहे. आता भाजपा नावाची ही कीड सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. ज्या उद्देशाने या सर्वांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यांचा उद्देश विधानसभा निवडणुकीत पूर्ण होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
टिळक भवन येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्या वेळी प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, राजन भोसले, नाशिकचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त, रोहन टिळक, कल्याण काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे, श्रीकृष्ण सांगळे, मदन जाधव आदी उपस्थित होते.