मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांसाठीचे महाविकास आघाडीचे जागावाटप येत्या २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी होणा-या आघाडीच्या बैठकीत अंतिम होणार आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे. त्या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज दिली. लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागांबाबत शरद पवार आणि राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली असून, लवकरच याची घोषणा होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
महायुतीचे जागावाटप अंतिम झालेले नाही. सोबतच विरोधी महाविकास आघाडीचे जागावाटपाचे घोडेही अडले आहे. सुरुवातीच्या काळात आघाडीच्या नेत्यांचे दौरे यांच्यामुळे बैठका झाल्या नाहीत. नंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण हे आघाडीच्या जागावाटप समितीत होते. त्यांच्याऐवजी आता समितीत कोण सहभागी होणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तसेच वंचितने ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे. त्याबाबतही आघाडीकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. विदर्भात जास्त जागा मिळविण्याबाबत काँग्रेस आग्रही आहे. त्यावरूनही आघाडीत रस्सीखेच सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्यांवर सहमती झालेली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, असे चेन्नीथला म्हणाले.
सिल्व्हर ओकवर
मॅरेथॉन बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील याबाबत चर्चा झाली आहे. जयंत पाटील यांनी याबाबत सांगितले, शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या संघटनेबाबत चर्चा केली. लोकसभेच्या जागावाटपाच्या वृतांबाबत चर्चा झाली. राज्यात किती जागा जिंकू शकतो, याची माहिती त्यांना दिली.
राहुल गांधी-शरद पवार
यांच्यात झाली चर्चा
लोकसभा निवडणुकांच्या बाबतीतला महाराष्ट्रातील पेच लवकरात लवकर सोडवला जाईल. शरद पवार व राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी
४२ जागा जिंकेल : पटोले
आज प्रदेश काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक टिळक भवन येथे पार पडली. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला केंद्रीय निवड समितीचे अध्यक्ष मधूसुदन मिस्त्री, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, विलास मुत्तेमवार, डॉ. नितीन राऊत, के. सी. पाडवी, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम आदी नेते उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मविआ लोकसभेच्या ४२ जागांवर विजय संपादित करेल, असा विश्वास व्यक्त केला.
अद्याप ९ जागांचा तिढा
लोकसभेच्या ४८ जागांपैकी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात ३९ जागांवर तोडगा निघाला आहे. आता ९ जागांवर प्रश्न अडला आहे. त्यात मुंबईतील ३ जागांचा तिढा आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर संवाद साधला. तिन्ही नेत्यांमध्ये जागावाटपांवर चर्चा झाली. त्यामुळे आगामी बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊ शकते.