मुंबई : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. महायुतीतून महाविकास आघाडीकडे वळालेल्या माजी आमदार के. पी. पाटील किंवा ए. वाय. पाटील यांच्या गळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारीची माळ पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हालचालींना वेग आला आहे. ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणाच्या नावाला पसंती देणार? याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच घडणा-या घडामोडींमुळे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुक अस्वस्थ झाले असून त्यांनी मुंबईकडे धाव घेतली आहे.
राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार के. पी. पाटील यांना उमेदवारी मिळेल, असा दावा पाटील यांच्याकडूनच केला जात आहे. दुसरीकडे ए. वाय. पाटील हेच राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असा छातीठोकपणे दावा स्वत: ए. वाय. पाटील करत आहेत.
निष्ठावंत शिवसैनिकालाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संधी देतील, असा दावा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांतील घडामोडी पाहता एकंदरीतच राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. मात्र कोणत्या नावावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्का मारला आहे, हा सस्पेन्स कायम आहे.
ए. वाय. पाटील यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचे ठिकठिकाणी जाहीर केले आहे. त्यामुळे इतर इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. माजी आमदार के. पी. पाटील यांनी देखील आता मुंबईकडे धाव घेतली आहे. कार्यकर्त्यांकडून त्यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. दरम्यान के. पी. पाटील यांनी सकाळी सकाळीच मुंबई गाठली आहे.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील यांनी आज सकाळीच मुंबई गाठली आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ए. वाय. पाटील हे आज सकाळी मतदारसंघातच प्रचारात व्यस्त असल्याची माहिती दिली आहे. प्रकाश पाटीलही कोल्हापुरात असल्याची माहिती दिली आहे. मात्र के. पी. पाटील यांनी मुंबई गाठल्यानंतर मतदारसंघात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.