कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही.तर दुस-या बाजूला आता महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून एकमत झाल्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सतेज पाटील यांनी हे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत प्रबळ दिसेल. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये १५० जागांवर एकमत झाले आहे. आमच्यामध्ये मुख्यमंत्रिपद हा वादाचा मुद्दाच नाही. शिवसेनेने, राष्ट्रवादीने कोल्हापुरात जागा मागितल्या आहेत. पण आमच्यात एकमत झाले आहे.
महाविकास आघाडी राज्यात मोठी दिसणार
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळणार असून, ती राज्यात मोठी दिसेल. इतकेच नाहीतर कोल्हापुरात महाविकास आघाडी नक्कीच दिसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील : बच्चू कडू
प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय स्थिती आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये होणारे परिणाम याबाबत वक्तव्य केले. सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अशी अनेक चिन्हं दिसून येत आहेत. त्यामुळे अजित पवार हे महायुतीमधून बाहेर येतील, असे वाटत आहे. किंबहुना ते आता आमच्यामध्ये येतील आणि महाशक्ती तयार होईल, असे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.