24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीत १२५ जागांवर सहमती

महाविकास आघाडीत १२५ जागांवर सहमती

संगमनेर : प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत १२५ जागांवर सहमती झाली असून राहिलेले जागावाटप देखील लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सवानंतर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने जागावाटप पूर्ण होईल. एमआयएमबाबत प्रस्ताव आल्याची मला माहिती नाही. मात्र, जे काही निर्णय होतील ते उच्च पातळीवर होतील असे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. तर विधानसभा निवडणुकीत १८० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असेही वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमच्या दोन-तीन बैठका आत्तापर्यंत झाल्या आहेत. या बैठकीमध्ये १२५ जागांवर सहमती असल्याचे दिसून आले आहे. इतर जागांवर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाईल. एमआयएमबाबत कोणता प्रस्ताव दिलाय याची मला माहिती नाही. मात्र असं काही असेल तर त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल. आमचे जागा वाटप लवकरच पूर्ण होईल आणि राज्यात महाविकास आघाडी १८० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नव्हे तर…
विधानसभा निवडणुकीत महायुतीत काही मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की, महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नव्हे तर ख-याखु-या लढती सध्या सुरू आहेत. त्यांच्यात सगळ्यांना पुढे जायचं आहे कोणी मागं जायला तयार नाही. आमच्या जागा वाटपात आम्ही देखील आग्रह धरू. मात्र जो काही निर्णय असेल तो सहमतीनेच घेतला जाईल. महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? अशी चर्चा आम्ही कधीच करत नाही, असे त्यांनी म्हटले.

चंद्रचूड हे ‘त्या’पलीकडचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी हजेरी लावत श्री गणेशाची आरती केली. याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, सरन्यायाधीश हे मोठं नाव आहे. ते महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच वाटतो. न्यायव्यवस्थेवर सरकार दबाव टाकतं ही चर्चा सध्या सुरू आहे. मात्र चंद्रचूड हे त्या पलीकडचे आहेत, असे मला वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले की, याबाबत उद्धव ठाकरेंनी कायम भूमिका मांडलेली आहे. ते धर्मात भेद करत नाहीत. देशविरोधी वागणा-या मुस्लिमांच्या विरोधात आम्ही आहोत, हे उद्धव ठाकरे कायम सांगतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे निश्चित कौतुक केले पाहिजे, त्यांनी योग्य अशी भूमिका घेतली आहे. मुस्लिमांना त्यांचे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हे योग्य आहे आणि आमचा देखील तसा प्रयत्न राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR