मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकित बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी सुरुवातीला ३० नोव्हेंबरपर्यंतच ठेवण्यात आला होता. परंतु, ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता याची मुदत एक महिन्याने म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली. पण आता पुन्हा एकदा महावितरणने या योजनेत मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ३१ मार्च २०२५ पर्यंत ग्राहकांना त्यांचे थकित वीजबिल भरता येणार आहे.
दरम्यान, महावितरण अभय योजनेचा आतापर्यंत राज्यातील ९३ हजार ८४८ वीजग्राहकांनी लाभ घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून थकित वीजबिल ग्राहकांकडून १३० कोटी रुपयांचा भरणा झाला असून त्यांना ५७ कोटी ३६ लाख रुपयांचे व्याज व २ कोटी १२ लाख रुपयांचा विलंब आकार माफ झाला आहे. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे. तसेच, वीजग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहनही महावितरणने केले आहे.
तर या योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.
महावितरण अभय योजनेत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहक एकरकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्च दाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रँचायझी क्षेत्रातील वीजग्राहकांनाही ही योजना लागू आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, वीजग्राहक या योजनेचा वापर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतात.