मुंबई : प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महिला अत्याचारांविरोधात देशात कठोर कायदे करण्याचीही मागणी होत आहे. राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन महिला अत्याचारांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. असे असतानाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.
राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य महिला आयोग बरखास्त करावा अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकरांनी थेट शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. तुतारीचे पदाधिकारी महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आघाडीवर आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची कार्यशाळा घ्यावी, असा आरोप चाकणकरांनी केला आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये राज्य महिला आयोग सक्षमपणे काम करत आहे. राज्यात कुठेही महिला अत्याचाराचे प्रकार घडल्यानंतरच राज्य महिला आयोगाची आठवण येते. कारण राज्य महिला आयोगच न्याय मिळवून देईल असा विश्वास लोकांमध्ये आहे. हे माझ्या कामाचे यश आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार घडल्यास त्याची सर्वांत आधी दखल महिला आयोगाकडून घेतली जाते. पण जर पोलिस काही प्रकरणांमध्ये कारवाई करत असतील तर त्यात आयोग ढवळाढवळ करत नाही. त्याशिवाय जर एखाद्या प्रकरणात महिलेला न्याय मिळण्यास उशीर झाल्यास आयोगाकडून तातडीने दखल घेतली जाते. पण तरीही विरोधकांकडून टीका होत राहते.