22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमहिलेच्या नावावर गॅसजोड केल्यास ३ सिलिंडर मोफत मिळणार; पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा

महिलेच्या नावावर गॅसजोड केल्यास ३ सिलिंडर मोफत मिळणार; पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा

पुणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत महिलांना वर्षभरात तीन गॅस सिलिंडर देण्याची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यासाठी संबंधित महिलेच्या नावावर गॅसजोड असण्याची अट घालण्यात आली होती.
मात्र, आता त्यात बदल करण्यात आला असून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ देण्यात येणार असून कुटुंबातील अन्य सदस्याच्या नावावरील गॅसजोड संबंधित लाभार्थी महिलेच्या नावावर करावा लागणार आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचीदेखील घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. याचा लाभ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

मात्र, ज्या महिलांच्या नावे गॅसजोड आहे, अशांनाच याचा फायदा देण्यात येईल अशी अट घालण्यात आली होती. यामुळे ही योजना सामान्य महिलांसाठी फायदेशीर ठरणारी असली तरीदेखील या योजनेपासून अनेक महिला वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे राज्य सरकारने आता या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

राज्यात बहुतांश गॅसजोड घरातील पुरुषांच्या नावावर आहेत. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असतानाही महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होणार होती. राज्य सरकारने आता पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेला गॅसजोड लाभार्थी महिलेने स्वत:च्या नावावर हस्तांतरित केल्यावर, त्या महिलेला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. याचा फायदा राज्यातील कोट्यवधी महिलांना होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR