28.1 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeसोलापूरमागील ११ महिन्यांत चार कोटींचा मुद्देमाल जप्त तथा नष्ट :नितीन धार्मिक

मागील ११ महिन्यांत चार कोटींचा मुद्देमाल जप्त तथा नष्ट :नितीन धार्मिक

सोलापूर :
हातभट्टीमुक्त जिल्हा मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक व हातभट्टी तयार करणाऱ्यांवर छापे टाकले जातात. मागील ११ महिन्यांत जवळपास चार कोटींचा मुद्देमाल जप्त तथा नष्ट केला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील मोठ्या प्रमाणावर कारवाईचे नियोजन असून नागरिकांनीही माहिती दिल्यास निश्चितपणे गावागावांमधील हातभट्टीची विक्री व निर्मिती बंद होईल.असे , सोलापूर विभाग राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगीतले .

राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिल २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या काळात जिल्ह्यातून तब्बल ६० हजार लिटर हातभट्टी आणि १२ लाख लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले आहे. ग्रामीण पोलिसांनीही अंदाजे तेवढाचा मुद्देमाल जप्त केला. पण, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टीमुक्त जिल्हा आणि ग्रामीण पोलिसांकडून ऑपरेशन परिवर्तन राबविले जात असतानाही जिल्ह्यात हातभट्टीची नशा वाढलेलीच आहे, हे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

जिल्ह्यातील ५४ गावांमध्ये विशेषत: तांड्यांवर अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार होते. दक्षिण सोलापुरातील सर्वाधिक ११, उत्तर सोलापूर व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी नऊ, अक्कलकोट तालुक्यात सहा आणि करमाळा तालुक्यात सात ठिकाणी वारंवार हातभट्टी तयार होते, असे निरीक्षण राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोंदविले आहे. ग्रामीण पोलिसांनी पहिल्यांदा जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन राबवून गावागावातील तरुणांना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण, आता तेवढा प्रयत्न, कारवाईतील सातत्य दिसत नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते, पण त्यांची एवढी भीती अवैध व्यावसायिकांना नाही. त्यामुळे दोन्ही विभागांनी समन्वयातून आठवड्यातून किमान तीनवेळा धाडी टाकल्यास निश्चितपणे ऑपरेशन परिवर्तन यशस्वी होईल.

दक्षिण सोलापुरातील तिल्लेहाळ, दोड्डी, उळेवाडी, गुरप्पा, मुळेगाव, वडजी, शिवापुढारी, सीताराम या तांड्यांसह बक्षिहिप्परगा व वरळेगाव याठिकाणी हातभट्टी तयार होते. उत्तर सोलापुरातील कोंडी, गुळवंची, तिऱ्हे, सेवालाल, कवठे, भोजप्पा व घोडा तांडा, खेड व शिवाजीनगर, अक्कलकोटमधील कलकर्जाळ, कोर्सेगाव, तडवळ, मुंढेवाडी, बासलेगाव, नागोर तांडा, बार्शीतील भातंबरे तांडा, पंढरपुरातील देगाव, लक्ष्मी टाकळी व वाखरी व करमाळ्यातील सर्पडोह, करमाळा, भाळवणी, जिंती- पारेवाडी, हिंगणी, वांगी, केत्तूर मोहोळ तालुक्यातील बेगमपूर व भांबेवाडी यासह माळशिरसमधील कुरभावी, गुरसाळे, धर्मपुरी, चांदापुरी, चंद्रपुरी, विजोरी, चव्हाणवाडी, सवतगव्हाण पारधी वस्ती, पिलीव सांगोल्यातील पाचेगाव खु. हतीद, वाकीशिवणे, महीम, चिकमहूद व महूद याठिकाणी हातभट्टी तयार होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR