घरात पूजा करताना साडीने घेतला पेट
उदयपूर : वृत्तसंस्था
राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री गिरीजा व्यास आगीच्या कचाट्यात आल्याने गंभीररित्या जखमी झाल्या. घरातच पूजा करीत असताना साडीचा पदर आगीच्या झळांमध्ये आल्याने अगोदर त्यांच्या साडीने पेट घेतला. त्यानंतर त्या पूर्णपणे आगीत भाजल्याची दुर्घटना घडली. त्यानंतर त्यांना तात्काळ उदयपूरच्या अमेरिकन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर त्यांना गुजरातमधील अहमदाबाद येथे रेफर करण्यात आले.
माजी केंद्रीयमंत्री गिरीजा व्यास या आपल्या घरी नवरात्री पूजाची आरती करत असताना गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. पूजा करताना घरात लावण्यात आलेल्या दिव्यामध्ये त्यांच्या साडीचा पदर आल्याने साडीने पेट घेतला. घरातील नोकराने ते पाहिल्यानंतर तात्काळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना उदयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे भाऊ गोपाल शर्मा हेही रुग्णालयात दाखल झाले. मात्र, तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर गंभीर जखमी असल्याने व्यास यांना अहमदाबाद येथे हलविण्यात आले.