बीड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ट्वीट केल्याप्रकरणी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट करत रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली. पण यावर प्रतिक्रिया देताना रुपाली ठोंबरे यांनी ‘माझ्याविरोधात बीडमध्ये दाखल केलेला गुन्हा खोटा आहे.’, असा आरोप केला. तसेच मी कोणालाही घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना, रुपाली ठोंबरे यांनी सांगितले की, माझ्या विरोधात बीडमध्ये दाखल केलेला गुन्हा खोटा आहे. एफआयआरमध्ये ज्यांच्याबद्दल बदनाम झालं असं म्हणतात त्यांचं नावच नाही. जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पण मी घाबरणार नाही. मी स्वत: बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांची बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेले चॅट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले होते. यावरून सध्या जितेंद्र आव्हाड आणि रूपाली ठोंबरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
या पोस्टनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीनंतर रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे आणि सौरभ आघाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट केले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत ‘कर नाही तर डर कशाला?’ असे म्हणत पोस्ट शेअर केली. त्यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, माझे खोटे व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल करणा-यांविरुद्ध काल रात्री मी बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे.