बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. याअनुषंगाने आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी कराड याच्या आईने केली आहे. यासाठी त्यांनी परळी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील सुरू केले आहे.
बीडच्या केजमधील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याने पोलिसांना सरेंडर केलेलं आहे. त्यानंतर पोलिसांकडून या तपासाला वेग आलेला आहे.
सध्या दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात कराड हा पोलिस कोठडीत आहे. मात्र हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या व माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी करत वाल्मिक कराड याची आई पारूबाई बाबूराव कराड (७५) यांनी आज सकाळपासून परळी शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.