23.8 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeसंपादकीय विशेषमातृसंस्थेचे अंजन आणि ‘नकुशी’ झालेली राष्ट्रवादी !

मातृसंस्थेचे अंजन आणि ‘नकुशी’ झालेली राष्ट्रवादी !

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊन केंद्रात नवे सरकार सत्तारूढ झाले असले तरी या निवडणुकीचे कवित्व अजून संपलेले नाही. ते लवकर संपणारही नाही. कारण लोकांनी कौलच तसा दिला आहे. भाजपाला ३०३ वरून २४० वर खाली खेचताना एनडीए म्हणजे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सरकार स्थापन करता येईल एवढे बहुमत मतदारांनी दिले. यामुळे भाजपाला सलग तिस-यांदा सत्ता मिळाली असली तरी स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न भंगले आहे. मध्य प्रदेश व ओडिशा या दोन राज्यांनी साथ दिली नसती तर ‘चारशे पार’च्या कल्पनेत रमलेल्या लोकांना सत्तेतून हद्दपार व्हावे लागले असते.

मतदारांनी कौलच असा दिलाय की सत्ता मिळालीय ते पराभूत झाल्यासारखे दिसतायत, व ज्यांना सत्ता मिळाली नाही ते विरोधी बाकावर विजेत्यांच्या तो-यात बसले आहेत. ‘यशाचे अनेक बाप असतात, अपयश पोरके असते’, असे म्हणतात. लोकसभेतील पीछेहाटीचे प्रत्येक जण आपल्या माहितीप्रमाणे आणि मगदुराप्रमाणे अर्थ लावतो आहे. भाजपा नेते आपल्या परीने याचा प्रतिवाद करत आहेत. विरोधकांनी संविधान बदलाबाबत केलेला अपप्रचार हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. वस्तुत: हा मुद्दा भाजपाच्याच काही वाचाळवीरांमुळे चर्चेला आला होता. कर्नाटकातील भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी सर्वप्रथम हा विषय उपस्थित केला. पक्षाकडे दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमत आल्यानंतर संविधानात बदल केले जातील, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.

भाजपाने लगेच हे त्यांचे व्यक्तिगत मत असल्याचे सांगून सारवासारव केली. हेगडेंना उमेदवारी नाकारली. पण व्हायचे ते नुकसान झाले होते. निवडणूक काळातही आणखी दोन नेत्यांनी याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे भाजपाचा ’चारशे पार’चा नारा याचसाठी असल्याचे चित्र निर्माण झाले व त्याचा लाभ विरोधकांना घेता आला. मोदी सरकारची कार्यपद्धती, विरोधकांना संपवण्यासाठी केलेले तत्त्वशून्य राजकारण, असे अनेक मुद्दे या पीछेहाटीला कारणीभूत आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेतेही खाजगीत यावर भरभरून बोलतात. अशावेळी भाजपा परिवाराची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाने भाजपाला घायाळ केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत, संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी निकालाचे परखड विश्लेषण करत भाजपा नेतृत्वाच्या डोळ्यात अंजन घातले आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांना भाजपने सोबत घेतल्यामुळेच भाजपचे नुकसान झाले, असा थेट आरोप ‘ऑर्गनायझर’मधील लेखात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात याचे पडसाद उमटले असून महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.

‘ऑर्गनायझर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मोदी ३.० : कन्व्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन’ या लेखात अजित पवारांमुळे भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वत:ची किंमत केली. तुम्ही एकमेकांसोबत युती केली, तरी शेवटच्या स्तरावरील मतदारांना ते पसंत पडलेले नाही. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मिळून सरकारकडे पुरेसे बहुमत होते. तरीही अजित पवार यांना का सोबत घेतले? असा सवाल या लेखात उपस्थित केला आहे. अनेक वर्षे ज्या विचारधारेविरुद्ध लढा दिला अशा लोकांना सत्तेसाठी भाजपने सोबत घेतले. संघावर व संघाशी संबंधित संस्थांवर भगवा दहशतवाद पसरवल्याचा आरोप करणा-या आणि मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला आरएसएसचा कट म्हणणा-या लोकांना सोबत घेतल्यामुळे संघात नाराजी होती. ती शारदा यांनी आपल्या लेखात मांडली आहे.

त्याचवेळी रतन शारदा यांनी आपल्या लेखात पुढे असे म्हटले आहे की, ‘सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून विजय मिळत नसतो, जमिनीवर कठोर परिश्रम घ्यावे लागतात. भाजप कार्यकर्ते त्यांच्याच नादात मश्गुल होते, मोदींच्या नावावर विजय मिळणार असे गृहीत धरून चालले होते. ‘आएगा तो मोदी ही’ असे मानणारे कार्यकर्ते ‘ग्राऊंड रिअ‍ॅलिटी’पासून दूर होते. हाच अति आत्मविश्वास त्यांना नडला, असे खडे बोल या लेखातून भाजपाला सुनावण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनीही, ज्यांना अहंकाराची बाधा झाली होती, त्यांना जनतेने २४१ जागांवर रोखले, अशा शब्दांत फटकारले आहे. स्वत: सरसंघचालक मोहन भागवत यांनीही सौम्य शब्दांत भाजपाच्या सध्याच्या कार्यपद्धतीबाबत नापसंती व्यक्त केली आहे. खरा सेवक काम करताना शिष्टाचार राखतो. शिष्टाचार राखताना तो अविचल राहतो. ‘मी हे केले, ते केले’ असा कोणताही श्रेयवाद करत नाही. सेवक कधीच अहंकार दाखवत नाही.

फक्त अशा व्यक्तीलाच सेवक म्हणण्याचा अधिकार आहे.. हे त्यांचे बोधामृत कोणासाठी होते, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निवडणूक काळात एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पूर्वी भाजपाला संघाची मदत घ्यावी लागत होती. मात्र आता भाजपा स्वयंपूर्ण आहे, असे सांगून अप्रत्यक्षपणे संघाच्या मदतीची आम्हाला आता आवश्यकता नसल्याचेच सूचित केले होते. ‘‘सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते. हा या दोन्ही कालखंडातला फरक आहे. पक्षाची आता वाढ झाली आहे. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. ते आपलं काम करतात, आम्ही आमचं काम करतो, या जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने संघ परिवारातील मंडळी चांगलीच दुखावली होती. ही खदखद आता बाहेर यायला लागली आहे.

अजित पवार गटातील अस्वस्थता वाढली !
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागा मिळाल्या. त्यातील दोन ठिकाणी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या लोकांना उमेदवारी द्यावी लागल्याने त्यांच्या गोटात नाराजी होतीच. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल व बारामतीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीतील पराभवामुळे अस्वस्थता ही वाढली आहे. त्यातच संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’ मधील लेखाने आणखी भर घातली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एक राज्यमंत्रिपद देऊ केले गेले. कॅबिनेट मंत्रिपद देणार नसाल तर राज्यमंत्रिपदही नको अशी भूमिका घेऊनही भाजपाने फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे पुढील काळात अजित पवार गटाची, या गटातील अस्वस्थ आमदारांची भूमिका काय राहील याबाबत कुजबूज सुरू झाली आहे.

‘ऑर्गनायझर’ मधील लेखावर प्रतिक्रिया व्यक्त करताना छगन भुजबळांनी पराभवाचे खापर उगाच आमच्यावर फोडू नका असे सुनावले. महाराष्ट्राबाबत त्यांचे विश्लेषण योग्य असेलही, पण उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतही राष्ट्रवादीमुळे फटका बसला का? असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. लोकसभा निवडणुका आटोपताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेत आम्हाला शिंदे गटाएवढ्याच व किमान ८० जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. भाजपा स्वत: किमान १५० ते १६० जागा लढवण्याची तयारी करत आहे. मनसे सोबत आली तर त्यांना २० ते २५ जागा सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे अजित पवार व शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्येकी पन्नास, पंचावन जागांवर समाधान मानावे लागणार आहे. बदललेल्या राजकीय वातावरणात ‘नकुशी’ होऊन तडजोडी स्वीकारायच्या की योग्य वेळी उलटं फिरायचं? अशा द्विधा मन:स्थितीत काही लोक दिसत आहेत.

त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण सध्या वेगळ्या टप्प्यावर आले आहे. केवळ अजित पवार गटातलेच नाही तर अन्यही काही लोक या मन:स्थितीत असू शकतील. जालन्यात रावसाहेब दानवे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात हत्यार उपसले आहे. नांदेडमधील पराभवामुळे दुखावलेल्या माजी खासदार प्रताप चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. लोकसभेच्या जागावाटपापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपा म्हणेल ते होणार नाही, याची चुणूक दाखवली आहे. यामुळे महायुतीत सध्या विसंवाद दिसतो आहे. परस्पर विश्वास कमी झालाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन, ‘हम साथ साथ है’ हे सांगितले. विधानसभेचे रणशिंग फुंकले. तर सत्ताधारी महायुतीतील पक्ष एकमेकांवर शिंगं रोखून उभे आहेत. यावर वेळीच इलाज करतील अशी अपेक्षा आहे. अन्यथा २०१९ च्या लोकसभेनंतर जशी ‘महा भरती’ दिसली तशी यावेळी ‘महा ओहोटी’ दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

-अभय देशपांडे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR