23.8 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeसंपादकीयमानवतेची हत्या

मानवतेची हत्या

वसईत मंगळवारी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. रहदारीच्या रस्त्यावर एका माथेफिरू प्रियकराने आपल्या प्रेयसीवर पोलादी पान्याने १५ ते १६ वार करून तिची निर्घृण हत्या केली. वसई पूर्वच्या गावराईपाडा येथे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली. त्यावेळी रस्त्यावर लोकांची वर्दळ सुरू होती. परंतु त्यापैकी कुणीही या घटनेतील हत्या-यास रोखण्याचा प्रयत्न केला नाही. रस्त्यातून अनेकजण जात-येत होते मात्र, तरुणीची दिवसाढवळ्या हत्या होताना कोणीही मदतीस न धावल्याने मानवतेचीही हत्या झाली असेच म्हणावे लागेल. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला पोलिसांनी अटक केली.

नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु गत महिनाभरापासून त्यांच्यात बे्रकअप झाला होता. आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. आरती वसईच्या एका कंपनीत कामाला होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र, गावराईपाडा येथील स्टेट बँकेसमोर रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी रोहितने आणलेल्या पोलादी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर पुन्हा वार केले. आरती गतप्राण झाल्यावर रोहित तिथेच बसून होता. आरतीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून एका महिन्यापूर्वीच ती कामाला लागली होती. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर गर्दी होती.

आरोपी आरतीवर वार करत असताना लोक व्हीडीओ काढण्यात मग्न होते. कोणीही तिला वाचवायला पुढे आले नाही. फक्त एक तरुण आरोपीला अडवायला पुढे आला होता पण त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यावेळी चार लोक पुढे आले असते तर आरतीचे प्राण वाचले असते. घटनेच्या दोन दिवस आधी रोहितने आरतीला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती. तिने आचोळे पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता रोहितला केवळ समज देऊन सोडून दिले होते. त्याचवेळी पोलिसांनी कठोर पावले उचलली असती तर आपल्या बहिणीचे प्राण वाचले असते अशी खंत आरतीच्या बहिणीने व्यक्त केली आहे. वसईतील भीषण घटना घडल्यानंतर प्रश्न पडतो की, समाजमन, समाजभान बिघडले आहे काय? वरचेवर समाज षंढ बनत चालला आहे काय? वसईत दिवसाढवळ्या इतका भयंकर प्रकार घडूनही सामाजिक किंवा राजकीय स्तरावर त्याचे कोणतेच तीव्र पडसाद उमटलेले दिसत नाहीत.

एका प्रियकराने आपल्या पे्रयसीची वर्दळीच्या रस्त्यावर निर्घृण हत्या केली तेव्हा आजूबाजूने जाणारा जमाव निर्लज्जपणे हा सगळा प्रकार पाहत होता. पण कोणाचीही त्या तरुणाला रोखण्याची हिंमत झाली नाही. त्यावेळी चार लोक एकत्र आले असते तर हत्या-याला रोखता आले असते. परंतु त्याऐवजी आपल्या मोबाईलमधून घटनेचे चित्रीकरण करणारे तरुण म्हणजे गुन्हेगारापुढे नांगी टाकणारे षंढच म्हटले पाहिजेत. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. परंतु केवळ भीतीपोटी लोक अशा घटनांमध्ये पडायला घाबरतात. स्वत:च्या जीवाबरोबरच त्यांना पोलिसांचा ससेमिरा टाळायचा असतो. अर्थात ही सारी कारणे मुर्दाडांची प्रवृत्ती दर्शविणारी ठरतात. जिथे कुत्र्या-मांजरासाठी जीव टाकणारे लोक पहायला मिळतात तिथे एका महिलेला वाचवण्यासाठी एकाही पुरुषाला पुढाकार घ्यावासा वाटला नाही. याचा अर्थ एकच, भेकडांच्या समाजात माणुसकीची हत्या! गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही.

गुन्हा करूनही आपण कायद्याच्या कचाट्यातून सहिसलामत बाहेर पडू शकतो अशी प्रवृत्ती बळावत चालली आहे. अनेक प्रकारचे गुन्हे करून निर्दोष सुटणा-यांची संख्या कमी नाही. पाच वर्षांची शिक्षा भोगून गुन्हेगार पुन्हा उजळ माथ्याने समाजात फिरायला मोकळे! महिला अत्याचाराच्या संदर्भात सरकारी स्तरावर कोणतेच कठोर धोरण नाही. म्हणूनच इतकी क्रूरता वाढताना दिसते आहे. अशा भयंकर गुन्ह्यांविरुद्ध कठोर उपाययोजना करण्याची संवेदनशीलता सरकारमध्ये उरलेली नाही. गुन्हे घडत राहतात. विनाकारण निष्पापांचे बळी जात राहतात. निर्ढावलेल्या प्रवृत्तींचा हैदोस सातत्याने सुरू राहतो. शेकडो लोकांच्या डोळ्यादेखत गुन्हा करणा-या गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाल्याशिवाय अशा भयंकर घटना घडणे थांबणार नाही. आंध्र प्रदेशात महिलांवरच्या अत्याचाराविरोधात शक्ती नावाचा कायदा आहे. वीस दिवसांत अशा गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची त्यात तरतूद आहे. अशाच स्वरूपाचा कायदा महाराष्ट्रातही आणण्याची वेळ आली आहे.

लोकांच्या डोळ्यादेखत जेव्हा इतका क्रूर प्रकार घडतो तेव्हा त्या गुन्हेगाराइतकाच केवळ बघ्याची भूमिका घेणारा समाजही नराधम ठरतो. असे गुन्हे रोखण्याकरिता कठोर उपाययोजना न करणारे सरकारही कृतघ्न ठरते. समाजाने तर आपल्या भेकडपणाचे प्रदर्शन केलेले आहेच पण महिलांवरच्या अत्याचाराला कठोरपणे मोडून काढण्याचा पुरुषार्थ नसलेले सरकारही मुर्दाड ठरते. क्रूर प्रकार घडण्यामागे अनेक कारणे आहेत. चित्रपट आणि इंटरनेटच्या माध्यमातून क्रूरतेला भरपूर खतपाणी मिळत आहे. घराघरातला सभ्यपणाचा विचार, संस्कार टिकवून ठेवण्याची निकड संपुष्टात येऊ लागली आहे. कुटुंबाकुटुंबातील, शेजा-यापाजा-यातील वैमनस्य इतके टोकाला पोहोचले आहे की, मनुष्य म्हणून स्वाभाविकपणे असणारी माणुसकी पराभूत होताना दिसते आहे. अशा पराभूतांच्या तांड्यामध्ये हिंस्त्र श्वापदेच पैदा होणार!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR