27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयमान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार?

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार?

मुंबई : प्रतिनिधी
यंदा पावसाळ््याच्या सुरुवातीपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस पडत आहे. देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस झाला. तसेच महाराष्ट्रातही ब-याच भागात जोरदार पाऊस बरसला. विशेषत: मुंबई, पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरात पाऊस झाला. तुलनेने मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी या भागातही आधून-मधून जोरात सरी कोसळत असल्याने ब-याच भागात पाणीच पाणी झाले आहे. मात्र, अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा धडाका सुरूच असून, मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते.

देशात ब-याच भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रातील ब-याच भागासह दिल्ली, गुजरात, राजस्थानात जोरदार पाऊस पडत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्येही पावसामुळे हाहाकार सुरू आहे. आता ऑगस्ट संपला तरी पावसाचा जोर कायम असून, सप्टेंबरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यातच सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने एक तर मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच मान्सूनचा परतीचा प्रवासही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबू शकतो. त्यामुळे खरीप पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फटका शेती उत्पादनाला बसू शकतो.

हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचा पट्टा बनल्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार आहे. यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. मान्सून परतण्यास सप्टेंबर अखेर किंवा त्यानंतर सुरुवात होऊ शकते. भात, कापूस, सोयाबीन, मका, डाळी आदींचे उत्पादन सप्टेंबर अखेर घेतले जाते. यापैकी ब-याच शेतपिकांची काढणीची वेळ असते. परंतु पाऊल लागून राहिल्यास शेतीपिकांना फटका बसू शकतो. त्यातच जर ऑक्टोबरमध्ये पाऊस पडत राहिला तर शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.

सप्टेंबरच्या तिस-या आठवड्यात कमी दाबाची प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. साधारणपणे जूनमध्ये पाऊस सुरू होऊन तो १७ सप्टेंबरपर्यंत संपतो. परंतु यंदा तो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पाऊस पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे खरीप पिकांना हा पाऊस मारक ठरू शकतो. यासोबतच पाऊस पडत राहिल्यास शेतमालाच्या निर्यातीवरदेखील परिणाम होऊ शकतो. तसेच खाद्यपदार्थांची महागाई वाढू शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

रबी पिकांसाठी लाभदायी
ऑक्टोबरमध्ये पाऊस पडत राहिल्यास रबी पिकांच्या पेरणीसाठी पोषक स्थिती राहणार आहे. अर्थात थंड वातावरण आणि ओल्या शेतजमिनीत पेरमी केल्याने रबी पिकांची उगवण चांगली होऊन गहू, हरभरा पिकांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. मात्र, खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR