मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक राज्यांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला. त्यातच राज्यात मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. यावरुन विरोधकांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी मानसन्मान संख्याबळावर मिळतो, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे.
दरम्यान, मंत्रिपदाच्या शर्यतीत अजित पवार गट मागे पडल्याने विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. ते म्हणाले, अजित दादांना जे पाहिजे ते मिळवायचा प्रयत्न केले पण अपयश आले. कुणालाही मान सन्मान संख्याबळावर मिळतो.अजित पवारांची स्थिती सन्मान करण्यासारखी काही राहिले नाही,जे मिळेल ते खावे,राज्यमंत्रीपद मिळाले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था आहे.असे त्यांनी म्हटले.
वापरा अन् फेका ही भाजपची नीती
भाजप सोबत घेते पण पक्ष संपवते, हे अजित पवारांना आता समजले असेल, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. उद्धव ठाकरेंना समजले तसे ते दूर गेले. भाजप हा बेईमानांचा पक्ष आहे. उपयोग झाला की फेकून द्यायचे ही त्यांची नीती आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
गद्दारीचा शिक्का लागलेली मंडळी
शिंदेंच्या आमदार घरवापसीवर वडेट्टीवार म्हणाले, गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे. बोलायला जागा नाही,ही गद्दारी शिक्का लागलेली मंडळी आहेत. पार्टी संपली आहे, गेलेले अजित दादा किंवा शिंदे यांचे ४०आमदार घरवापसी करतीलअशी परिस्थिती आहेत.