पुणे : वृत्तसंस्था
मायक्रोसॉफ्ट या कंपनीने पुण्यात १६ एकर जमीन खरेदी केली. या जमिनीचा व्यवहार ऑगस्ट महिन्यात झाला होता. त्यासाठी ३१.१८ कोटी रुपये नोंदणी शुल्क भरले. ६ सप्टेंबर रोजी ही नोंदणी झाली आहे. २०२४ च्या सुरुवातीला, मायक्रोसॉफ्टचे भारतातील प्रमुख कौशल पहल म्हणाले होते की, त्यांचा उद्देश २०२५ पर्यंत २ दशलक्ष लोकांना आर्टिफिशल इंटेलिजेन्स आणि डिजिटल कौशल्ये शिकवण्याचे आहे. त्यामुळे कंपनीची भारतातील रणनीती तेव्हाच स्पष्ट झाली.
मायक्रोसॉफ्टने या वर्षांच्या सुरुवातीला हैदराबादमध्ये २६७ कोटीत ४८ एकर जमीन घेतली होती. कंपनी त्या ठिकाणी आपला डेटा सेंटर उभारणार आहे. गूगल आणि ऍमेजॉनसोबत मायक्रोसॉफ्ट डेटा ‘हायपरस्केलर’ आणि डेटा लोकलायजेशनमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. ऑपरेशनल आणि डेटा केंद्रांव्यतिरिक्त, मायक्रोसॉफ्टकडे हैदराबाद, बंगळुरू आणि नोएडामधील केंद्रांमध्ये सुमारे २३,००० कर्मचारी कार्यरत आहेत.
मायक्रोसॉफ्ट इंडियाचा पुण्यातील हा दुसरा मोठा जमीन करार आहे. यापूर्वी कंपनीने येथे २५ एकरचा भूखंड ३२८ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यावेळी मायक्रोसॉफ्टने फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून ही जमीन घेतली होती. मायक्रोसॉफ्टने पुण्यातील हिंजेवाडीत १६.४ एकर जमीन घेतली. ५२० कोटींत हा सौदा झाला आहे. ही जमीन इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपीने मायक्रोसॉफ्टला विकल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन वर्षांत मायक्रोसॉफ्टने एकूण ८४८ कोटींची जमीन खरेदी केली आहे.