22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeसोलापूरमाळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानाला सुरुवात

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानाला सुरुवात

पंढरपूर : पूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत आज सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष बॅलेट पेपरवर मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मारकडवाडीत पाच डिसेंबर पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू असतानाही येथील ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मतदान प्रक्रिया सुरू केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये मतदारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासनाने ही मागणी धुडकावून लावत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर व त्यांच्या समर्थकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येथे जवळपास १९०५ मतदारांनी मागील निवडणुकीमध्ये मतदान केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांना ८४३ तर, भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना १००३ इतक मतदान झाले होते. येथील बहुतांश मतदारांनी आपण उत्तम जानकर यांना मतदान केले असल्याचा दावा केला आहे.

त्यामुळे दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हावे यासाठी येथील ग्रामस्थांनी फेर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा देशात पहिलाच प्रयोग राबवला जात असल्याने येथील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आमदार उत्तमराव जानकर हे दोन दिवसांपासन या गावामध्ये तळ ठोकून आहेत. या प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR